३८ लाखांचा गांजा, एमडी ड्रग्ज नष्ट

Foto

'झीरो टॉलरन्स' धोरणांतर्गत पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जप्त करण्यात आलेला तब्बल ३८ लाख ४२ हजार ४९१ रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट केला. अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांच्या 'झीरो टॉलरन्स' धोरणाचा भाग म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वेदांतनगर, एमआयडीसी सिडको,
सातारा, वाळूज, दौलताबाद, सिटीचौक आणि एमआयडीसी वाळूज या पोलीस ठाण्यांमध्ये 'एनडीपीएस' कायद्यान्वये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालावर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये १८३
किलो २०९ ग्रॅम गांजा, एमडी पावडर आणि डायजापाम पावडरचा समावेश होता. हा सर्व साठा एमआयडीसी सिडको येथील मध्यवर्ती गोदामात सुरक्षित ठेवण्यात आला होता.
अंतिम आदेशानुसार विल्हेवाट
▶ न्यायालयाकडून इन्व्हेंटरी पंचनामा आणि न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा सर्व अमली पदार्थांचा साठा कडेकोट पोलीस बंदोबस्तात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या शासनमान्य प्रकल्पात वाहनाद्वारे नेण्यात आला आणि नियमानुसार पूर्णपणे नष्ट करण्यात आला.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशान्वये उपायुक्त पंकज अतुलकर, शशिकांत सातव, सहायक आयुक्त मजहर सय्यद, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, मुकुंद पालवे, गणपत राहिरे, सचिन जाधव, उत्रेश्वर मुंडे, तसेच
अंमलदार नारायण पायघन व भाऊसिंग चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात शहरात यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.