पैठण, (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यात सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात, ङ्गगणपती बाप्पा मोरयाफ्च्या जयघोषात विविध मंडळांसह घराघरांत गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली.
गणेशमूर्तीच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, विविध सजीव देखावे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन केले आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली. कापड मंडई येथील गणेश मंडळाचे यावर्षी ८५ वे वर्षे असून माजी मंत्री अनिल पटेल यांच्या उपस्थितीत या गणेश मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गणेश मंडळाचे अध्यक्ष गौरव आठवले, सोसायटीचे चेअरमन निमेश पटेल, प्राध्यापक संतोष गव्हाणे, कल्याण बरकसे, राम शेठ अहुजा, दिनेश माळवे दीपक आहुजा आदी सहभागी झाले होते. श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची स्थापना व आरती आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.
याप्रसंगी शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किशोर चव्हाण, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक सुनील रासने, ईश्वर दगडे, गोवर्धन टाक, माजी नगरसेवक भूषण कावसनकर, सुनील बलदवा, किरण गाडेकर, बाळासाहेब मुंदडा, ताराचंद शिंगवी, बाबा राऊत यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पैठण तालुका मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे गणरायाची स्थापना करण्यात आली याप्रसंगी अध्यक्ष रमेश लिंबोरे, चंद्रकांत तारू, बद्रीनाथ खंडागळे, रमेश शेळके, गौतम बनकर, नंदकिशोर चव्हाण, एकनाथ काळे, दादा घोडके, ज्ञानेश बावणे, कृष्णा भुजबळ, योगेश भुजबळ, गणेश पवार आदींची उपस्थिती होती.
गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनाने पैठण तालुक्यातील वातावरण भक्तिमय झाले असून, पुढील काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.














