छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : खडकेश्वर भागातील राजस्थानी हॉस्टेलच्या भिंतीजवळ झोपलेल्या दोन कचरावेचकांच्या पायावरून अज्ञात वाहन चालकाने गाडी घालून चिरडले. त्यानंतर तो पसार झाला. या अपघातात कचरावेचक छायना रमेश यांचा उपचारादरम्यान ८ मार्च रोजी मृत्यू झाला असून, दुसरा किरकोळ जखमी झाला. ही घटना ६ मार्च रोजी घडली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध सोमवारी (दि.१६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नवनाथ पांडुरंग कापते (५०, रा. भोईवाडा) आणि त्यांचा मित्र छायना रमेश हे दोघे कचरा वेचण्याचे काम करतात. ६ मार्च रोजी रात्री १०:३० च्या सुमारास जेवण करून ते खडकेश्वर येथील राजस्थानी मुलींच्या हॉस्टेलच्या कंपाउंड वॉलजवळ आपल्या गोण्यांसह झोपले होते. मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान तिथे उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीच्या चालकाने वाहन रिव्हर्स घेताना तिथे झोपलेल्या दोघांच्या पायावरून गाडी घातल्याने छायना रमेश याच्या पायांना दुखापत झाली होती.
रात्रभर जखमी अवस्थेत पडून
रात्रीची वेळ असल्याने आणि कोणाकडेही मोबाईल नसल्याने त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही. ७ मार्च रोजी सकाळी एका चहावाल्याने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही घाटीत दाखल केले. मात्र गंभीर जखमी झालेल्या छायना रमेश यांचा ८ मार्च रोजी रात्री ९ वाजता मृत्यू झाला. मंगळवारी (दि.१७) रमेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले













