कचऱ्याला आग; कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे शेजारील कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रात घडली असून, याप्रकरणी एका कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शामल महेंद्र राजपूत (३१, रा. कांचनवाडी, पैठण रोड) यांना गुरुवारी (दि.९) सकाळी ८ वा. कंपनीबाहेर आग लागल्याची माहिती मिळाली. दरम्यान, त्यांनी तत्काळ कंपनीत धाव घेतली.

यावेळी कंपनी कामगारांनी टाकीतील पाण्याने आगीवर मारा करून नियंत्रण मिळवले. तसेच सदर घटनेची चौकशी केली असता, शेजारील मगर इंजिनियरिंग (के १८०) मधील कामगार नामदेव बालाजी दांडेकर याने कंपनी परिसरातील कचऱ्याला आग लावल्याचे समोर आले. ही आग हवेमुळे इतरत्र पसरुन ती बाजूच्या विनस इंडस्ट्रिज (के १८१) भागात पोहोचली. या आगीमुळे कंपनीच्या डीपीमधून मशीनरीला वीजपुरवठा करणारी ४ गेजची मुख्य केबल जळाली. यामध्ये अंदाजे १ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

यासंदर्भात विचारणा केली असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले. मात्र, महावितरणच्या सहायक अभियंत्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसल्याचा अहवाल दिला. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.