छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या छाप्यात क्रांती चौक परिसरातील गायत्री मेवाड प्रा. लि. आणि बीड बायपासवरील छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्युएट हॉल या प्रसिद्ध हॉटेलमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. अस्वच्छ वातावरण आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने दोन्ही आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित केले आहेत.
एफडीएचे सहआयुक्त करकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान गायत्री मेवाडमधील भयानक अस्वच्छता तसेच शिजवलेले अन्न व भाज्या चक्क शौचालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तात्पुरता आडोसा करून कापल्या जात होत्या. खरकटी भांडी आणि सांडपाण्याच्या थेट संपर्कात उघड्यावर नूडल्स थंड करण्यासाठी ठेवले होते. तसेच, ज्वारी आणि बाजरीच्या पिठामध्ये जिवंत किडे आढळून
आले. कढईतील तेल वारंवार वापरल्यामुळे काळेकुट्ट झाले होते, तसेच जुन्या अन्नाचा पुनर्वापर केला जात असल्याचे स्पष्ट दिसून आले.
प्रशासनाच्या नोटिसीला केराची टोपली
विशेष म्हणजे, गायत्री मेवाड रेस्टॉरंटला १८ डिसेंबर २०२५ च्या तपासणीनंतर सुधारणा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही सुधारणा न केल्याने १० एप्रिल रोजी न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. प्रशासनाच्या आदेशांना वारंवार केराची टोपली दाखवून ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रेस्टॉरंटवर अखेर कठोर कारवाई करत परवाना निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions















