पैठण , ( प्रतिनिधी ) उद्धव ठाकरे आजपासून चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीचा आणि सरकारी मदतीचा आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नांदर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टी नुकसानीची भरपाई (भरपाई) प्रत्यक्षात किती मिळाली, मिळाली की नाही, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.
मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलो नाही. तुम्ही सर्व कंटाळला आहात. दरवेळी निवडणुका आल्यावर आम्ही राजकीय नेते येतो. तुमच्या कोपराला गुळ लावून जातो. तुम्ही भोळेभाबडे आहेत. स्वप्न दाखवलं की बळी पडता आणि आपलं आयुष्य देऊन टाकता. मराठवाड्यावर गेल्या वर्षभरात आपत्तीवर आपत्ती येत आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. कधी नव्हे ते एवढं मोठं संकट मराठवाड्याने अनुभवलं आहे. ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सांगितलं असा पाऊस पाहिला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी तेव्हाही आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली. मी शेतकऱ्यांशीच बोललो. तुमची मागणी मांडली. एक तर हेक्टरी 50 हजार मिळाले पाहिजे ही मागणी बरोबर की चूक तुम्हीच सांगा. थकीत कर्ज फेडणार कसं. हातातील पिक गेलं. खरीप गेलं. रब्बी कसं घेणार जमीन खरडून गेलं आहे, असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला
दयावान सरकारचा अभ्यास सुरू आहे. मी माझं मोठेपण सांगत नाही. मुख्यमंत्री असताना कर्तव्य केलं. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. मी कर्तव्य म्हणून केलं. समिती नेमली नाही. मी कर्जमुक्ती केली. हे अभ्यास करत आहेत. सर्व शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकारकडे आहे. महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमुक्ती योजना राबवली. त्याची माहिती सरकारकडे आहे. परदेशी समिती नेमली. परदेशी समिती येणार आणि स्वदेशी समिती नेमली. गेल्या आठवड्यात काही तरी होईल वाटलं होतं. सर्व एकजूट झाले होते. परत मुख्यमंत्र्यांनी गुळ लावला, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
सरकार पंचांग पाहून कर्जमाफी करणार का?
मी मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती.महायुती सरकारने अतिवृष्टी,पूर बाधित शेतकरी,व्यापारी,नागरिक यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टी चे पॅकेज दिले जाईल असे आश्वासन दिले होते.परंतु त्यांनी ते आश्वासन पाळले नाही.पंचांग पाहून ते कर्जमाफी करणार आहेत का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर येथे बुधवारी सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना महायुती सरकारला सवाल केला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की महायुती सरकारने जून मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. मग तोपर्यंत शेतकऱ्यांचे हप्ते का भरून घेता असा सवाल त्यांनी केला आहे. युती सरकारने दिलेल्या आश्वासना नंतर हि अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. हे सरकार निर्दयी असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,माजी खासदार चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर,माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे ,डॉ. सुनील शिंदे,शिवाजी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रल्हादऔटे,सौ.राखी परदेशी ,प्रकाश वानोळे,सोमनाथ जाधव, शुभम पिवळ ,अजय परळकर,स्वाती माने यांच्या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.















