विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सिल्लोड, (प्रतिनिधी) अंधारी गिरजा नगर, झाडी वस्ती, (ता. सिल्लोड) येथील श्री गिरजा माला मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसर सजविण्यात आला असून, भाविक भक्तांच्या, स्वागतासाठी गिरजा गड संस्थान सज्ज झाले आहे.
गिरजा माता पीठाधीश श्री. राजेंद्र ढवळे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, दररोज हरिपाठ, दांडिया, महाआरती, महाप्रसाद तसेच देवी महात्म्य ग्रंथाचे वाचन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सकाळच्या सत्रात शिवलीलामृत, सप्तशती पाठ वाचन आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवादरम्यान सप्तमीच्या दिवशी पुलाचा गादी भरण्याचा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री ८ ते १२ या वेळेत जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर होमहवनाचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अष्टमीच्या दिवशी भवानी माता मंदिरापासून ज्योत आणण्याचा कार्यक्रम होणार असून, संजय सांडू ढवळे यांच्या उपस्थितीत ही ज्योत गिरजा माता मंदिरात आणण्यात येणार आहे. यावेळी मंदिरातील दीपमाळ प्रज्वलित करण्यात येईल. १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक संतोष फकिरचंद्र वाघ आहेत. १६ ऑक्टोबर रोजी ह. भ. प. राधिकाताई महाराज चव्हाण यांचे कीर्तन होणार असून, कार्यक्रमाचे आयोजक रामचंद्र कडुबा तायडे व राजू बाजीराव तायडे आहेत.
दि. १७ऑक्टोबर रोजी ह. भ. प. साक्षी महाराज मोहाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक भावेश कैलास गोरे आहेत. १८ ऑक्टोबर रोजी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचे आयोजक डॉ. मनोहर गोरे व कैलास यापु सोनवणे आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संदीप ज्ञानेश्वर गोरे हे अन्नदाते म्हणून योगदान देत आहेत. नवमीच्या दिवशी सकाळी ८ ते ९ वाजता आरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गिरजा गडावर भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री गिरजा माता मंदिराच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे.















