सतर्क तरुणांमुळे सुखरूप सुटका; रिक्षाचालक पसार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहागंज येथून खेळत असलेल्या एका १० वर्षीय चिमुकलीला गोड बोलून रिक्षात बसवून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी (दि.२२) रात्री ही घटना घडली. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंधारात अपहरणकर्त्याची रिक्षा एका गेटमध्ये अडकली. तेथे उपस्थित असलेल्या काही सतर्क तरुणांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून बालिकेची सुखरूप सुटका केली. तरुणांचा जमाव जमल्याचे पाहून
अंधाराचा फायदा घेत रिक्षाचालक घटनास्थळावरून पसार झाला.
शहागंज भागात एक दहा वर्षांची बालिका खेळत होती. यावेळी तिथे एका रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली व त्या मुलीला बोलण्यात गुंतवले. बोलून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आमिष दाखवून तिला आपल्या रिक्षात बसवले व तो तिथून निघून गेला. हा रिक्षाचालक तिला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ट्रेझरी कार्यालयाजवळ पोहोचला. पुढे रस्त्यावर अंधार होता. याच अंधारात त्याची रिक्षा एका खड्डयात अडकली. सुदैवाने
यावेळी तिथे काही तरुण उपस्थित होते. त्यांना संशय आल्याने रिक्षाकडे धाव घेतली. आत जाऊन पाहिले असता, त्यांना एक १० वर्षांची मुलगी दिसली. त्यांनी रिक्षाचालकाला घेरून जाब विचारण्यास सुरुवात केली. परिस्थिती अंगलट येत असल्याचे पाहून रिक्षाचालक अंधारात पसार झाला. यानंतर तरुणांनी ११२वर संपर्क साधून घटनेची माहिती दिली आणि बालिकेला पोलिसांच्या ताब्यात दिले. सिटी चौक पोलीस ठाण्याचे सपोनि मनोज शिंदे घटनास्थळी धावले व रिक्षा ताब्यात घेतली.
https://epaper.sanjwarta.
Powered By: Vrudhee Solutions









