पैठण, (प्रतिनिधी): पैठण तालुक्यात यावर्षी पावसाचे असमान व अत्यल्प प्रमाण, पावसातील दीर्घ खंड तसेच विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत झालेली घट यामुळे शेतकरी वर्गासमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
त्यामुळे पैठण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी, शेतमजूर, पशुपालक व ग्रामीण नागरिकांसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पैठण तालुका काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सतीश पेंडसे यांनी स्वीकारले. यावेळी भाऊसाहेब काळे, किरण पाटील डोणगावकर, राहल सावंत काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रमेश मुळे, दिलीप भोसले, संभाजी काटे, सदानंद खडसन, किशोर दसपुते, लतीफ सय्यद, रवींद्र आमले, हसन पठाण, गणेश गायकवाड आणि उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की निवेदनात तालुक्यातील पर्जन्यमान, पीकस्थिती व पाणीसाठ्याचे तातडीने सर्वे क्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा आणि त्याआधारे पैठण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रति हेक्टर ७५ हजार रुपयांची मदत देण्याबाबत ठोस प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कर्जवसुली स्थगित करून कर्जाचे पुनर्गठन करण्यासह दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पशुधनासाठी तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील शेतमजूर व बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) मागेल त्याला तात्काळ काम उपलब्ध करून द्यावे, तसेच रोजगाराच्या मागणीपासून काम मिळेपर्यंत अनावश्यक विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जायकवाडी धरणातील पाण्याचे नियोजन करून पैठण तालुक्यातील शेतीसाठी आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच खेडी प्रकल्प व बृहत् मृदूजलसाठा / लिफ्ट प्रकल्पांना प्राधान्याने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून मागणी प्राप्त होताच टँकर सुरू करण्यात यावेत आणि त्यासाठी अनावश्यक प्रशासकीय विलंब होऊ नये, तसेच टँकरच्या फेऱ्यांचे नियमित निरीक्षण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
दुष्काळी परिस्थिती गंभीर असून शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांना तातडीच्या शासकीय मदतीची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या दुष्काळ निवारण निकषांनुसार उपलब्ध सर्व सवलती व मदतीचा लाभ पात्र नागरिकांना तातडीने देऊन पैठण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.













