: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) आई, मुलासह सुनेवर गुंडांनी चाकूहल्ला करीत धुडगूस घातल्याची घटना रविवारी (दि. २४) रात्री ९ वाजता पदमपुरा भागात घटना घडली होती. याप्रकरणी चार जणांविरुद्ध वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. एक तडीपार पसार झाला आहे.
तुषार सुंदरलाल मेहरा (२८), त्याचे साथीदार चेतन लोधे, दीपक टाक आणि नीलेश गंगावणे अशी आरोपींची नावे आहेत. तुषार तडीपार गुन्हेगार असून तो फरार झाला आहे,
अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. मीनाबाई घनश्याम बरंडवाल (६०) या फिर्यादी आहेत. त्या घराबाहेरील शीतला माता मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा अजय (३८) याने त्यांच्याकडे खर्चासाठी २०० रुपयांची मागणी केली.
मीनाबाईंकडे पैसे नसल्याने त्या नकार देत असतानाच आरोपी तुषार मेहरा तिथे उभा राहून अजयकडे रागाने पाहत होता. विनाकारण वाद नको म्हणून मीनाबाईंनी अजयला घरी जाण्यास सांगितले. अजय
घराकडे जात असतानाच तुषारने मागून पळत येत त्याला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून मीनाबाई आणि त्यांची सून संजना अजयला सोडवण्यासाठी धावल्या. मात्र, तुषारने त्याचे साथीदार चेतन, दीपक आणि नीलेश यांना बोलावून घेतले. या चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान, तुषारने नीलेशकडील चाकू घेऊन अजयच्या पाठीवर सपासप वार केले. तुषारने अजयच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारले. तसेच मीनाबाईनाही मारहाण केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













