सरकारच्या शिष्टमंडळाला यश.. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम

Foto
पाटोदा : मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलनाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. गणेशोत्सवाचा काळ आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न पाहता प्रशासनाने आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी दिली नव्हती, तरीही जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या मार्गावर होते.

मनोज जरांगेंना सरकारने कोणती हमी दिली? 
सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचं गॅझेट तीन महिन्यांत जीआर काढून लागू करु
हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारीत जीआर काढू
हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांना वैधता देणे चालूच राहील
शिंदे समितीस मिळालेल्या ५८ लाख नोंदी घटवणार नाही 
मराठवाडयातील ४ लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्रे वैध करु

सरकारच्या शिष्टमंडळाची भेट आणि चर्चा
प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील बीडमधील पाटोदा येथे मुक्कामी होते. अशातच सकाळी सहा वाजता सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळामध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख  राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस आणि बीडचे जिल्हाधिकारी होते. या बैठकीत मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

९० दिवसांची मुदत आणि कडक इशारा
मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे यांनी सरकारला ३ महिन्यांचा वेळ दिला आहे. या वेळेत सातारा गॅझेट काटेकोरपणे लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. उपोषण फक्त स्थगित करण्यात आले असून आंदोलन कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. जर सरकारने या काळात कोणताही धोका किंवा चालढकल केली, तर पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने मुंबई गाठू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

समर्थकांना माघारी फिरण्याचे आवाहन
मुंबईला निघालेल्या मराठा आंदोलकांना मनोज जरांगे यांनी आपापल्या घरी जाण्याचे आवाहन केले आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील पुन्हा उपचार घेण्यासाठी आंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला मोठा वाद तूर्तास टळला आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत- मनोज जरांगे 
आज सकाळी ५ वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बीडमधील पाटोदा येथे दाखल झालं होतं. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. जवळपास १.३० तास मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला खुन्नस देणं चांगलं नाही. चर्चा न करणारे आज चर्चेसाठी आले की नाही?, आरक्षणापेक्षा समाजाची इज्जत महत्वाची आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आलं, तर काय करणार?, असा सवालही मनोज जरांगेंनी उपस्थित केला. तसेच राधाकृष्ण विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करु पण आता नाही. मंत्र्यांनी टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही, असंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले...?
     छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज (१७ सप्टेंबर) उपोषण स्थगित  करण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचा मला आनंद आहे. मनोज जरांगेंच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या आम्ही मान्य केल्या होत्या. एका मागणीबाबत आम्ही त्यांना कायदेशीर अडचणी सांगितल्या होत्या. त्यामुळे आम्ही ज्या मागण्या मान्य केल्या आहेत, समितीने जे काही आश्वसने दिली आहेत, ते सर्व आम्ही पूर्ण करु, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आमचे निर्णय आधीच झाले आहेत, काही प्रशासकीय अडचणी आहेत, त्या दूर करायच्या आहे, तेही आम्ही करु...सरकार नेहमीच सकारात्मक राहिलंय. आमचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. मराठा समाजासाठी मी आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले, तेवढे निर्णय कधीच कोणी घेतले नाही. मराठा समाजाला जे काही मिळालं, ते आमच्या काळात मिळालेलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता कुठल्याही सणामध्ये विघ्न न येता, आज हे उपोषण स्थगित झालंय, याचा मला आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.