वडीगोद्री (जालना): आज मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या सर्वात कडक आणि विना मंडप आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर दखल आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज थेट आंदोलनस्थळी धाव घेत राज्य सरकारचा '१२ मुद्द्यांचा अधिकृत मसुदा' मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला आहे. "मराठ्यांच्या मागण्यांवर सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे, त्यामुळे हट्ट सोडून उपोषण स्थगित करा. उपोषण करायचेच असेल तर हट्टाने भर उन्हात न बसता सावलीत बसून करा, स्वतःचे आरोग्य धोक्यात घालू नका," अशी आग्रही विनंती विखे पाटलांनी केली आहे.
"दिरंगाई झाली हे मान्य, पण आम्हाला हा विषय प्रतिष्ठेचा करायचा नाही!"
जरांगे पाटील यांना मसुदा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवरील चुकांची जाहीर कबुली दिली. ते म्हणाले, "मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन स्तरावर सातत्याने काम सुरू आहे. काही त्रुटी आणि अडचणी होत्या, हे आम्ही नाकारत नाही. विशेषतः क्षेत्रीय आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या पातळीवर झालेल्या कमालीच्या दिरंगाईमुळे आणि अडथळ्यांमुळे मराठा समाजामध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे, हे वास्तव आहे. मात्र, राज्य शासनाला हा प्रश्न अजिबात प्रतिष्ठेचा करायचा नसून तो सकारात्मक पद्धतीने सोडविण्याची आमची प्रामाणिक भूमिका आहे."
"घाईगडबडीत होकार दिला अन् कोर्टात टिकला नाही, तर समाजाची फसवणूक होईल!"
सातारा गॅझेटच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील यांनी कायदेशीर पेच स्पष्ट केला. "काही मागण्यांवर आम्ही विभागीय स्तरावर तातडीने प्रशासकीय आदेश काढत आहोत. मात्र, प्रत्येक मागणीला कायदेशीर चौकटीचा विचार न करता तत्काळ होकार दिला आणि नंतर न्यायालयात ती टिकली नाही, तर ती समाजाची मोठी दिशाभूल ठरेल. त्यामुळे कायदेशीर चौकटीत राहूनच निर्णय घ्यावे लागतील. आम्ही दिलेल्या १२ मुद्द्यांच्या मसुद्याचा तुमच्या अभ्यासक आणि तज्ज्ञांसोबत सविस्तर अभ्यास करा आणि तोपर्यंत उपोषण स्थगित करा," असे आवाहन त्यांनी केले.
"जीआर निघाला की सुरुवातीला योग्य म्हणतात, नंतर त्रुटी काढतात"; जरांगेंचा अभ्यासकांवर घणाघात!
सरकारच्या भूमिकेवर आणि १२ मुद्द्यांच्या मसुद्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी काही तथाकथित मराठा अभ्यासकांवर अत्यंत शेलक्या शब्दांत तीव्र संताप व्यक्त केला. जरांगे म्हणाले, "सध्या प्रत्येक दगडाखाली विंचू असल्यासारखे मराठा आरक्षणाचे अभ्यासक तयार झाले आहेत. एखादा जीआर निघाला की सुरुवातीला हेच अभ्यासक तो कसा योग्य आहे हे सांगतात आणि नंतर चार दिवसांनी त्यात शेकडो त्रुटी असल्याचे सांगून समाज संभ्रमात टाकतात!"
जरांगे पाटील मसुद्याचा अभ्यास करणार
दरम्यान, विखे पाटलांनी पुन्हा एकदा "सावलीत बसा, चर्चा करा," अशी विनंती केली असता, "सरकारकडून आलेल्या या १२ मुद्द्यांच्या मसुद्याचा आमची कोर कमिटी आणि तज्ज्ञ आधी सविस्तर अभ्यास करतील, आणि त्यानंतरच आंदोलनाची पुढील अंतिम भूमिका जाहीर करू," असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता या १२ मुद्द्यांच्या इनसाईड स्टोरीकडे लागले आहे.