नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष सध्या ८व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. कर्मचाऱ्यांनी ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी लावून धरली असून, यामुळे किमान मूळ वेतन थेट ₹६९ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. किमान मूळ वेतन ₹५५ प्रति महिना होते. तर कमाल मूळ वेतन: ₹२,००० प्रति महिना होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४६ मध्ये पहिला वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अवघे ५५ रुपये होते.
२रा वेतन आयोग (1959) – स्वातंत्र्योत्तर पहिली मोठी सुधारणा
किमान मूळ वेतन ₹८० प्रति महिना, तर कमाल मूळ वेतन ₹३,००० प्रति महिना एवढे करण्यात आले. १९५९ मध्ये दुसऱ्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाली. यामध्ये किमान वेतनात २५ रुपयांची वाढ होऊन ते ८० रुपये करण्यात आले, तर कमाल वेतन ३ हजार रुपये झाले.
३रा वेतन आयोग (1973) – पगार पोहोचला शंभरच्या पार
किमान मूळ वेतन ₹१९६ प्रति महिना तर कमाल मूळ वेतन ₹३,५०० प्रति महिना करण्यात आले. १९७३ मध्ये लागू झालेल्या तिसऱ्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट ₹१९६ प्रति महिना केले, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात मोठा बदल झाला.
४था वेतन आयोग (1986) – बेसिक पगारात थेट तिप्पट वाढ
किमान मूळ वेतन ₹७५० प्रति महिना व कमाल मूळ वेतन ₹८,००० प्रति महिना करण्यात आले. १९८६ च्या चौथ्या वेतन आयोगात किमान बेसिक पे थेट ७५० रुपयांवर नेण्यात आला, तर कमाल बेसिक वेतनाने ८ हजारांचा टप्पा गाठला.
५वा वेतन आयोग (1996) – 'फिटमेंट फॅक्टर' युगाची सुरुवात
फिटमेंट फॅक्टर १.७४ ठरविण्यात आला. यामुळे किमान मूळ वेतन ₹२,५५० प्रति महिना व कमाल मूळ वेतन ₹२६,००० प्रति महिना झाले. पाचव्या वेतन आयोगापासून पगार निश्चितीसाठी फिटमेंट फॅक्टरचा फॉर्म्युला प्रभावी ठरला. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन २,५५० रुपयांवर पोहोचले.
६वा वेतन आयोग (2006) – वेतनात मोठी झेप
फिटमेंट फॅक्टर: १.८६ ठेवण्यात आला. यानुसार किमान मूळ वेतन ₹७,००० प्रति महिना व कमाल मूळ वेतन ₹८०,००० प्रति महिना झाले. २००६ मध्ये लागू झालेल्या सहाव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ केली. किमान वेतन थेट ७,००० रुपये आणि कमाल वेतन ८०,००० रुपये झाले.
७वा वेतन आयोग (2016) – सध्याची वेतन रचना
फिटमेंट फॅक्टर: २.५७ ठरविण्यात आला. यानुसार किमान मूळ वेतन ₹१८,००० प्रति महिना, कमाल मूळ वेतन: ₹२,५०,००० (२.५ लाख रुपये) ठरविण्यात आले. २०१६ मध्ये ७व्या वेतन आयोगाने थेट २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू केला. यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान पगार १८,००० रुपये झाला, जो सध्या लागू आहे.
८वा वेतन आयोग (प्रस्तावित) – किती होणार पगारवाढ?
मागणी असलेला फिटमेंट फॅक्टर ३.८३ आहे, यानुसार गणित मांडल्यास संभाव्य किमान मूळ वेतन:₹६८,९४० (सुमारे ₹६९,०००) होते.
कसे केले जाणार गणित?
नवीन मूळ वेतन = सध्याचे मूळ वेतन (₹१८,००० * फिटमेंट फॅक्टर ३.८३). सरकारने ही मागणी मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळू शकते.