शासनाची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : बनावट खरेदीखत तयार करून जमिनीची मालकी मिळवण्याचा प्रयत्न नगर भूमापन कार्यालयाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतीन अहमद खान असदउल्ल-ाखान, शकील अहमद खान असदउल्लाखान (दोघे रा. बुढीलाईन) आणि मसूद खान अकील खान (रा. दिल्लीगेट) अशी आरोपींची नावे आहेत. नगर भूमापन कार्यालयाचे परीक्षक भूमापक गणेश बहुरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० जानेवारी २०२५ रोजी फेरफार क्रमांक ३६०५७ संदर्भात मूळ मालक शाहेदा बेगम यांनी आक्षेप नोंदवला. संबंधित खरेदीखत आपण केले नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. कार्यालयाने तात्काळ प्रकरण स्थगित ठेवून चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपींनी संगनमत करून बनावट खरेदीखत तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शाहेदा बेगम व खान रफिक अहमद यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या करून दस्त अधिकृत असल्याचा भास निर्माण केला. 
महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ ही योजना थकीत किंवा अपूर्ण मुद्रांक शुल्क नियमित करण्यासाठी राज्य शासनाने लागू केली होती. या योजनेअंतर्गत दंडात सवलत देऊन दस्त नोंदणीची संधी दिली जाते. मात्र या प्रकरणात 
आरोपींनी याच योजनेचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.