सरकारने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर उद्या दुपारपर्यंत सीजेपीकडे वेळ मागितला....

Foto
नवी दिल्ली : दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लबमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि 'कॉकरोच जनता पार्टी'च्या शिष्टमंडळात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर CJP चे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सरकारने आमच्या प्रमुख तीन मागण्यांपैकी दोन मागण्यांवर अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या तिसऱ्या मागणीवर निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ मागितला आहे, असा दावा CJP कडून करण्यात आला आहे.

सौरभ दास यांनी बैठकीतील मुख्य मुद्द्यांचा खुलासा केला. NEET पेपर लीक प्रकरणाच्या मानसिक तणावातून ज्या मृत विद्यार्थ्यांचा बळी गेला, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई देण्याच्या प्रस्तावावर सरकार अत्यंत सकारात्मक आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात किंवा 'संसद चलो' मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवर नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे आणि कायदेशीर कारवाया मागे घेण्यावर सरकारने तयारी दर्शवली आहे. मंत्र्यांसोबत प्रत्यक्ष टेबलवर सुमारे १० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. आमचे मुख्य मुद्दे आम्ही ठामपणे मांडले. दोन प्रमुख मागण्यांवर केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर उद्या दुपारपर्यंत सस्पेन्स!

CJP ची सर्वात मोठी आणि मुख्य मागणी असणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर या बैठकीत जोरदार चर्चा झाली. CJP नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने या मागणीवर विचार करण्यासाठी आणि हायकमांडशी चर्चा करण्यासाठी उद्या (शनिवारी) दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याचा निर्णय कळविण्यासाठी उद्या पुन्हा बैठक होणार आहे. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पुनरुच्चार CJP ने केला आहे.