१० हजारांची लाच घेताना ग्रामसेवकास पकडले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रहाळपट्टी तांडा, जटवाडा येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २४) रंगेहाथ पकडले. टीव्हीसेंटर चौकातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. राजोबा विठोबा काथार (५०, रा. वसंतनगर, जाधववाडी) असे ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार हे नोकरीला असलेल्या कंत्राटदाराने मौजे रहाळपट्टी येथे ग्रामनिधी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे काम केले होते. या कामाचे बिल ग्रामसेवक काथार याने मंजूर करून ते कंत्राटदाराला अदा केले होते. बिल अदा केल्याचे बक्षीस म्हणून काथार याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीने पडताळणीमध्ये ग्रामसेवक काथार याने २० हजारांची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. मंगळवारी टीव्ही सेंटर येथील हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला. तिथे पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने काथार याला अटक केली.