सिल्लोड, (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड नगरपरिषदेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीचा उत्साह आणि तिरंग्याचा अभिमान व्यक्त करत नागरिकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
छत्रपती संभाजीराजे चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. मुख्य मार्गाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नगरपरिषद कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांनी मोटारसायकल रॅलीत सहभागी होत नागरिकांसोबत तिरंगा रॅलीत
सहभाग नोंदविला.
रॅलीमध्ये परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ यांच्यासह नगरसेवक, नगरपरिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तिरंगा ध्वज हातात घेत भारत माता की जय च्या घोषणांनी शहरातील वातावरण देशभक्तीमय झाले होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.














