सिल्लोड, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आमठाणा ते बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी तसेच कोटनांद्रा ते म्हसला या महत्त्वपूर्ण सिमेंट काँक्रीट रस्ते विकास कामांचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
आमठाणा व त्यानंतर देऊळगाव बाजार, कोटनांद्रा, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी व खातखेडा येथे या रस्ते विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा झाला. अनेक वर्षांपासून या रस्त्यांसाठी मागणी होती. पावसाळ्यात खराब रस्त्यांमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या महत्त्वपूर्ण रस्ते विकास कामांना मंजुरी मिळवून दिली आहे.
एकूण १७ किलोमीटर लांबीच्या या सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी सुमारे १५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांतर्गत सहा ठिकाणी नळकांडी पुलांची उभारणी करण्यात येणार आहे.
मजबूत आणि टिकाऊ स्वरूपाचे हे सिमेंट काँक्रीट रस्ते तयार झाल्यानंतर ग्रामीण भागातील दळणवळण अधिक वेगवान व सुरक्षित होणार असून शेतमाल वाहतूक, शिक्षण, आरोग्य सेवा व बाजारपेठांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ङ्गङ्घविकास कामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता आहे, फ्फ़ असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार अब्दुल सत्तार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध स्थानिक प्रश्न जाणून घेतले. नागरिकांनीही या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत आमदार अब्दुल सत्तार यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता उमेश लिंभारे, शाखा अभियंता मंगेश दाबके, पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित सेठ बागवान, पं. स. सदस्य रघुनाथ मोरे, सुरेखा अंबादास शिंदे, माजी सदस्य सत्तार बागवान, डॉ. संजय जामकर, तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गणेश पा. गरुड, आमठाणा सरपंच रघुनाथ कदम, नामदेव कदम, मोईन सौदागर, नामदेव बनसोड सूर्यभान सोमासे, तुळशीराम मोरे, लक्ष्मण डफळ, संजय बनसोड, एकनाथ तायडे, बोरगाव बाजारचे उपसरपंच लक्ष्मण साखरे, माजी सरपंच नंदू चव्हाण, आदिंसह शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.









