पालकमंत्र्यांना धोबीपछाड, नागरेंची नियुक्ती थेट मुंबईहून

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर नागरे या कोणत्याही गटात नसलेल्या नगरसेवकाची गटनेते पदासाठी निवड केली. उपमहापौरपदापाठोपाठ महापालिकेतील आणखी एक महत्त्वाचे पद शिरसाट यांच्या हातून काढल्याने शिरसाट यांचे मनपात पंख छाटले जात असल्याची चर्चा आहे.  
जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांची पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. त्यात गेल्या काही दिवसांपासून भडकलेल्या शिरसाट-जंजाळ वादावर काही भाष्य होईल, अशी अपेक्षा होती. पण, तेथे तो विषय निघाला नाही. नवनियुक्त उपमहापौर जंजाळ यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा. रमेश बोरनारे, आमदार बालाजी कल्याणकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह प्रमुख स्थानिक नेत्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरे यांना गटनेतेपदी निवडीचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आमदार प्रदीप जैस्वाल, नगरसेवक ऋषीकेश जैस्वाल हे मात्र यावेळी उपस्थित नव्हते. त्यांनी सुरुवातीपासून नागरे यांच्यासाठी जोर लावला होता, असे सूत्रांनी सांगितले. अखेर नागरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.