ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार देखील जाईल, राहुल गांधी यांचा व्हिडिओ पोस्ट करत मोठा दावा

Foto
नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआरच्या मुद्यावरुन इंडिया आघाडीनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये इंडिया आघाडीकडून पहिल्यांदा निवडणूक आयोगावर खासदारांचा मोर्चा काढण्यात आला. दुसर्‍या दिवशी जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांना २४ तासात पोलिसांनी दोन वेळा ताब्यत घेतलं होतं. यानंतर तिसर्‍या दिवशी विरोधी पक्षाच्या खासदारांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलं तर काल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ज्ञानेश कुमार जातील, हे सरकार जाईल त्यांनतर लोकशाहीला पुन्हा भक्कम करण्याचं काम सुरु होईल, असं राहुल गांधी म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतच्या स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला. गेल्या चार दिवसात संसदेच्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीन चार दिवसात केलेल्या आंदोलनाबाबत आभार मानतो, असं राहुल गांधी म्हणाले. मी राजकारणात २००४ मध्ये आलो, तेव्हा देश लोकशाही आणि स्वतंत्र देश होता. २०१४  मध्ये आपल्याला समजलं नाही, देशात काहीतरी मुलभूत बदल झाला आहे. हेच तुम्ही पाहाल, हे सिद्ध झालंय आणि प्रत्येक भारतीयाला माहिती आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
 
मी लहान असताना मला शिकवलं गेलं, मनात रुजवलं गेलं की तुझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक भारतीयाचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य करणं ही आहे. मला प्रत्येक राज्यांची नावं, राजधानींची नावं शिकवण्यात आली. भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे, हे मला शिकवण्यात आलं. त्यामुळंच मी राजकारणात आलो, असं राहुल गांधी म्हणाले. 
आम्ही निवडणुका पाहिल्या आहेत, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणुका लढवल्या आहेत. आम्हाला माहिती आहे, आपण निवडणूक जिंकतो, आपण निवडणुकीत पराभूत होतो. आपला एखाद्या दिवशी पराभव होणारच नाही असा विचार कोणताही नेता करत नसतो. देशातील लोकशाही रचनेचा मी आदर करतो. मी वाट पाहिली, ते पाहिलं.  मोठ्या संख्येनं देशभक्त लोक या गोष्टीवर सातत्यानं विचार करत आहेत. एका दिवशी ते माझ्याकडे पुराव्यांसह आले. नावं वगळणे, नावं वाढवणे, मतदार यादीतील बदल याचे पुरावे घेऊन आले. लोकशाहीच्या रचनेच्या कार्यपद्धतीत समस्या निर्माण झाल्यास संविधान दीर्घकाळ राहत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

ज्ञानेशकुमारांना हटवल्यानं समस्या सुटेल हा विचार करु नका. सध्या निर्माण झालेली समस्या सोडवण्याठी या सरकारला बरखास्त करावं लागेल. त्यानंतर त्यांनी लोकशाहीला केलेलं नुकसान दुरुस्त करण्यासाठी कित्येक वर्ष लागतील, असं राहुल गांधी म्हणाले.