शिक्षकांच्या कार्याला कौतुकाची थाप देत सन्मान, ज्ञानविकास प्राथमिक शाळेला मिळाला अ दर्जा

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक शाळेने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५२६ मध्ये अ+ श्रेणी प्राप्त करून सिल्लोड तालुक्याचा मान उंचावला आहे. विशेष म्हणजे, सिल्लोड तालुक्यातून ही श्रेणी मिळवणारी ही एकमेव शाळा ठरली आहे.

शासन निर्णयानुसार दरवर्षी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्यासाठी सरल पोर्टलवर स्वतंत्र टॅब उपलब्ध करून दिला जातो. या प्रक्रियेत एकूण ४५६ गुणांचे सविस्तर मूल्यांकन केले जाते. शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, गुणात्मक उपक्रम, गुणवत्ता विकासाचे प्रयत्न आदी सर्व बाबींची माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागते. त्यानंतर या माहितीचे बाह्यपरीक्षण करण्यात येते. राज्यातून १०,७१२ शाळांची निवड या बाह्यपरीक्षणासाठी करण्यात आली होती.

 त्यापैकी ४२९ शाळा पात्र ठरल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५ शाळांनी यश संपादन केले असून, सिल्लोड तालुक्यातून ज्ञानविकास प्राथमिक शाळा ही एकमेव शाळा अ + श्रेणीस पात्र ठरली आहे. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, आनंददायी व सर्वांगीण शिक्षण देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक व सुस्थित पायाभूत सुविधा, शासनाच्या विविध योजनांची वेळोवेळी व परिणामकारक अंमलबजावणी, सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करणारे उपक्रम, या सर्वसमावेशक कार्यपद्धतीची दखल घेत ही मानांकित श्रेणी बहाल करण्यात आली.

 या यशामागे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर पानसरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, संस्थेचे प्रमुख अशोक गरुड, अरुण शिंदे, आर. डी. कांबळे, श्रीमती डॉ. दराडे, डॉ. सुनीता राठोड, डॉ. विशाल तायडे, गटशिक्षणाधिकारी रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे, डॉ. सतीश सातव, डॉ. येवते, डॉ. संजय गायकवाड, केंद्रप्रमुख राजेंद्र महाजन, शरद चव्हाण, गाडेकर, बडक यांचे मार्गदर्शन लाभले.

--- अधिकारी थेट शाळेत जाऊन केला शिक्षकांचा रोजनिशी देऊन सन्मान ---
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत बाह्य मूल्यमापन प्रक्रियेत शिक्षण विभागाचे अधिकारी व संस्थाचालक यांचे योगदान महत्त्वाचे असते; मात्र शाळास्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणीचे कार्य शिक्षकांकडूनच सातत्याने पार पाडले जाते. ज्ञानविकास प्राथमिक शाळेला अ श्रेणी मिळवून देण्यासाठी येथील सर्व शिक्षकांचे योगदान, नियोजनबद्ध प्रयत्न व सातत्यपूर्ण कार्य महत्त्वाचे ठरले. त्यामुळे तालुक्यात अव्वल ठरलेल्या या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे आणि मुख्याध्यापक किशोर जगताप यांच्या हस्ते शाळेला प्रत्यक्ष भेट देत शिक्षकांना रोजनिशी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

--शिक्षकांच्या बैठकीत मार्गदर्शन --
यावेळी आयोजित शिक्षक बैठकीत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी रमेश विठ्ठल ठाकूर म्हणाले की, शासन आदेश व नियमावलीनुसार कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहेच. परंतु शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित व सर्वांगीण असावे, यासाठी अचूक नियोजन व सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. जे शिक्षक प्रामाणिक धडपड करतात, त्यांची शाळा नेहमीच गुणवत्तेच्या शिखरावर राहते. शासन विविध गुणात्मक उपक्रम राबवून शाळांना पाठबळ देत आहे. या उपक्रमांत सर्वांनी अधिक क्षमतेने योगदान देणे, शासनाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांसाठी सर्वांगीण व सक्षम शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.