मुलगी होणार असल्याने केला गर्भपात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : तपासणीत तिसरीही मुलगीच असल्याचे स्पष्ट झाल्यावर सासरच्या लोकांनी घरीच बनावट डॉक्टर उभे करून विवाहितेला बळजबरी गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला. वेदना वाढल्यावर विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांना कळविले. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपींनी  पळ काढला.  नारेगावातील बलुच गल्लीत दि. ६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अखेर एमआयडीसी सिडको ठाण्यात सासरच्या लोकांसह बनावट डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद, सासरा फेरोज मन्सूर सय्यद, गर्भपातासाठी आलेली कमळ गोकूळ तिनगोटे, दोन पुरुष व एक महिला यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. २६ वर्षीय पीडितेचा पती अरबाज वॉशिंग सेंटर चालवितो. पीडितेला मोठी मुलगी ५ वर्षांची आहे. छोटी मुलगी २ वर्षांची आहे. पीडिता तिसर्‍यांदा गर्भवती राहिली होती. पाच महिन्यांची गर्भवती असल्याने ती माहेरी नारेगाव येथे गेली. २७ फेब्रुवारीला दुपारी आरोपी पती अरबाज हा दोन अनोळखी पुरुष व एका महिलेला घरी घेऊन गेला, त्यांच्याकडे एक मशीन होती. ते डॉक्टर असल्याचे पतीने सांगितले. ते मुलगा की मुलगी हे तपासणार असल्याचे सांगितले. तपासणीची गरज नाही, असे सांगितल्यानंतरही त्यांनी बळजबरी तपासणी केली. त्यानंतर पती आणि सासर्‍यांना मुलगी असल्याचे सांगितले. पीडितेवर सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत. त्यांनी तिची तपासणी केली. गर्भपात झाला आहे, तो कसा झाला, याबाबत डॉक्टरांचा अहवाल येईल. त्यानंतर आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे एमआयडीसी सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी सांगितले. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर सासर्‍याने पीडितेला माहेरी सोडले होते. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर ती चार महिन्यांनी सासरी नांदायला गेली होती. दुसर्‍या मुलीच्या जन्मावेळी ती खासगी रुग्णालयात होती. मुलगी जन्मल्यावर पती तिला तेथेच सोडून निघून गेला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.