नवी दिल्ली : १० ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीला दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी दिली असती, तर २० जुलै रोजी झाली, त्यापेक्षाही वाईट परिस्थिती उद्भवली असती, अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. १० ऑक्टोबर रोजी सीजेपीला जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी का देण्यात आली नाही? न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नावर दिल्लीच्या आयुक्तांकडून शपथपत्र दाखल करण्यात आले.
६ ते ८ ऑक्टोबरच्या काळात दिल्लीत गंभीर परिस्थिती
पोलीस आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, २० जुलै रोजी दिल्लीत आंदोलन झाले. त्यावेळी मोठ्याप्रमाणात हिसंक घटना घडल्या. अभिजीत दीपके आणि सौरव दास यांच्यासह सीजेपीच्या इतर नेते त्यांच्या समर्थकांना नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरले होते. त्यानंतर ६ आणि ८ ऑक्टोबरच्या काळात सातत्याने आंदोलने झाली. त्यामुळे मध्य दिल्लीमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली होती. वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली होती आणि त्यामुळेच १० ऑक्टोबर रोजी आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली.
अशी शंका होती की, १० ऑक्टोबर रोजीच्या आंदोलनाला परवानगी दिली गेली, तर २० जुलैपेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे उत्तर सर्वोच्च न्यायालयात दिल्लीच्या आयुक्तांनी दिले.
मध्य दिल्ली हे अति संवेदनशील भाग, सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागते
दिल्ली पोलीस आयुक्तांनी न्यायालयात सांगितले की, राष्ट्रपती भवन, संसद, सर्वोच्च न्यायालय, विविध देशांचे उच्चायुक्तालये आणि इतर महत्त्वाच्या संस्थांची कार्यालये आहेत; त्यामुळे मध्य दिल्ली हा भाग अति संवेदनशील आहे. या भागात सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवावी लागते.
कोणतेही पोलीस प्रशासन देशाची राजधानी दिल्लीतील सार्वजनिक व्यवस्थेचे उल्लंघन करण्यास परवानगी देऊ शकत नाही. विशेषतः अशा वेळी जेव्हा अशा संघटनेने आंदोलनाचे आव्हान केले असेल, जिचा इतिहास सामूहिक हिंसाचाराचा, अनेक लोक जखमी होण्याचा आणि ६,७ आणि ८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनांशी सलग्नित आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
आंदोलनामुळे मध्य दिल्लीतली व्यवस्था ठप्प झालेली
६ ते ८ ऑक्टोबर या काळात सातत्याने आंदोलने करण्यात आल्यामुळे मध्य दिल्ली भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली. अनेक तास वाहतूक सुरळीत होऊ शकली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे लोकांच्या रेल्वे गाड्याही सुटल्या, असेही दिल्ली आयुक्तांनी सांगितले.