सिल्लोड येथे पावसासह मोठ्या प्रमाणावर गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड तालुक्यातील निल्लोड परिसरात गारांचा पाऊस झाला. १९ मार्च रोजी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान गारांचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरात गहू व मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, गव्हाचे पीक हे होत्याचे नव्हते झाले. त्याच बरोबर उन्हाळी मका व कांदा या पिकांचेसुद्धा गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे समजते.
परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सरपंच उत्तम शिंदे यांनी केली.
या सोबतच फुलंब्री तालुक्यातील बोरगाव गणपती येथे गारांचा पाऊस होऊन गहू, मका, कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यावर शेतकरी चिंतातूर झाले आहेत. सरसकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
तासाभरानंतर पाऊस उघडल्यावर बाजारात पूर्ववत
कन्नड, (प्रतिनिधी) गुरुवारी दुपारी मेघ दाटून येत अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. गुरुवारचा आठवडी बाजार असल्याने गर्दी होती. अचानक झालेल्या पावसाने तारांबळ उडाली. तासाभरानंतर पाऊस उघडल्यावर बाजारात पूर्ववत गर्दी झाली.
गहू, ज्वारी, मका, कांदे आदी पिके भुईसपाट
वैजापूर, (प्रतिनिधी) : वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरामध्ये बुधवारी (दि. १८) रोजी रात्री दहा वाजता वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटानंतर गारांच्या पावसाला सुरुवात झाली. यामध्ये गहू, ज्वारी, मका, कांदे आदी पिके भुईसपाट झाली आहेत. तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जात अजून वाढ झाली आहे. उत्पन्न बाजूलाच राहिले पण बी बियाणे, खत, पेरणी खर्चदेखील आता निघत नसल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकन्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, शासन संकटाबरोबरच आसमानी संकटही शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही.
सरकारने सरसकट कर्जमाफी केली असती तर शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला असता, आता झालेल्या नुकसानींचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेले पिकांचे नुकसानीसंदर्भात खंडाळा मंडळाच्या कृषी सहायक माधुरी लेंडे यांच्याशी संपर्क साधला असता शुक्रवारी पीक पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.
खुलताबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे तालुक्यात पिकांचे नुकसान
खुलताबाद, (प्रतिनिधी) बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान
झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुधवारी सायंकाळपासूनच पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती. विजेचा कडकडाट व जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील सर्व गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.
पाऊस व जोरदार वाहणाया वाऱ्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या वेळी शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान यामध्ये गहू, ज्वारी, तसेच फळ पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमधील उभा असलेला गहू जमीनदोस्त झाला असून पाणी लागल्याने गव्हाची गुणवत्ता खालावली आहे. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.













