मनोज जरांगे पाटील यांच्यावर हाकेंचा सोलापुरातून पलटवार

Foto
सोलापूर : राज्य सरकारने कुणबी समाजाला लागू केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या दाखल्यावरुन पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची हाक देत पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. त्यात, सोलापूर दौऱ्यातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल केला. आता, जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून पलटवार केला जात आहे. लक्ष्मण हाकेंनी सोलापुरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. 

राज्यातील ओबीसी आरक्षण संपलेले आहे, आरक्षण संपलं की नाही हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं पाहिजे. राज्यभरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. महसूलमंत्र्‍यांना मी गिनत नाही हे दाखवतायत, ही दहशतवादाची भाषा आहे. ओबीसी नेते यांना सांगण आहे की,  आरक्षण संपलय आणि तुम्ही काही बोलायला तयार नाही. शासनकर्ते जमातच ओबीसी म्हणून निवडून आलेत मग मूळ ओबीसी कुठं आहेत? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला.  

ओबीसीच्या जागा ह्या मराठा कुणबी यांनी घेतल्या आहेत, त्यामुळे ओबीसीचे आरक्षण संपलेले आहे. कुणबीचे 4 प्रमाणपत्र रद्द झाले आहेत तर जरांगे थयथय नाचतोय. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जाते, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महसूल मंत्र्यांच्या व्यंगावर बोलतायत. राज्यातील पुरोगामी कुठं गेलेत? हा वर्णभेद नाही का? असा सवाल हाकेंनी केला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील हे बोलतायत, केवळ ओबीसींवर नाही, ओबीसी नेत्यांवरही बोलत आहे. महाराष्ट्रमध्ये अत्रे आणि ठाकरेंची भाषा बघितली, पण जरांगे नावाच्या माणसाने असली भाषा आणली आहे. विखे पाटील, उदय सामंत किती वेळा तुम्ही त्याला भेटायला जाणार? शिरसाठचे पावणे दोनशे कॉल होते असं म्हणतोय, याचा अर्थ बाकीच्यांना मतांचा एक अधिकार आणि त्याला जास्त आहे का? असे म्हणत हाकेंनी जरांगे पाटलांवर टीका केली. शिक्षकांची नोकर भरती निघाली आहे. कटींग लिस्टमध्ये लोकांना 10 टक्के ही जागा मिळणार नाही, कुठला रोस्टर तुम्ही सांगताय? महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरु आहे. आज ओबीसीचे आरक्षण संपलं आहे, दलित बांधवांनी आमच्यासोबत यावं, आज आम्ही जात्यात आहोत उद्या तुम्ही असणार आहात, असेही हाकेंनी म्हटले.