मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाथसागर जलाशयातील पाणीसाठा सकाळी ११ वा. फक्त अर्धा टक्का असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आधीच दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्याच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. नाथ षष्टी निमित्त अनेक भावी पैठण यथे असतात. सुमारे आठ ते नऊ लाख भावी यावेळी पैठण शहारत येतात त्यांचीदेखील यामुळे गैरसोय होणार आहे. सध्या पैठणकरांनाच पिण्याचे पाणी वेळेवर मिळणे अवघड झाले आहे. त्यातच नाथषष्ठी आठ दिवसांवर येउन ठेपली असून यात्रेकरूंसह पैठणकरांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
1 नोव्हेंबर 18रोजी धरणाची पाणी पातळी 1510.87 फुट 460.515 मीटर तर पाणी साठा 47.87 टक्के इतका होता. आज रोजी 1494.81 फुट 455.618 मीटर तर 0.54 टक्के पाणी साठा आहे. म्हणजे पाच महिन्यात 47.10 टक्के पाणी डाव्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात आले आहे. दि 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2018 या दरम्यान 13 टक्के पाणी कमी करण्यात आले. 1 ऑक्टोबर 18 रोजी 42.87 टक्के पाणी साठा होता तो 1 नोव्हेंबर 18 रोजी 29.62 टक्के झाला. दरम्यान गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेला डावा कालवा आज बंद करण्यात येणार आहे.
गतवर्षी शंभर टक्के भरलेले जायकवाडी धरण या वर्षी पन्नास टक्केही भरले नव्हते. त्यामुळे वर्षभर पाणी पुरेल का ?असा प्रश्न उभा राहिला. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे पाटबंधारे विभागाला जमलेच नाही. कालव्याद्वारे सोडलेले पाणी आणि बाष्पीभवन यामुळे धरणाचा पाणीसाठा लगोलग खाली आला. केवळ नियोजनाअभावी पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याचा आरोप आता होत आहे. अजूनही उन्हाळ्याचे अडीच महिने आणि पावसाळ्यातील किमान दीड महिना असे चार महिने मराठवाडा जायकवाडीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पाटबंधारे विभागाने वेळीच नियोजन करायला हवे होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने जायकवाडीच्या पाण्याचा बेसुमार उपसा केला गेला. ते पाहता येत्या काळात मराठवाड्यावर जल संकट कोसळणार यात शंका नाही.