सिल्लोड, (प्रतिनिधी): पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती, कागदी फुले, भिंतीफलक, सूचना फलक, प्रबोधनात्मक आकर्षक चित्रे आणि विविध सजावटीच्या हस्तनिर्मित वस्तू सादर केल्या. या कार्यक्रमाला जि. प. प्रा शाळा पालोद मुख्याध्यापक दिलीप सपकाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे होते.
प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण रंगीबेरंगी कागदांपासून बनवलेली फुले, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने कागद, सीडी आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या शोभेच्या फुलदाण्यांनी उपस्थितांचे लक्ष
वेधून घेतले. निसर्ग, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विषयांवर आधारित विद्यार्थ्यांनी बनवलेली चित्रे सुद्धा प्रदर्शनात मांडण्यात आली.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलात्मकतेला उत्तम व्यासपीठ मिळाले, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जि प प्रा शाळा पालोद मुख्याध्यापक दिलीप सपकाळ यांनी मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती आणि नवनिर्मितीची आवड निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
हे हस्तकला प्रदर्शन केवळ एक कार्यक्रम नसून, ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे मुलांना कलेच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते, असे मत मार्गदर्शक शिक्षिका जयश्री चापे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक दिलीप जाधव, राजेश ठोंबरे, योगेश निंभोरे, राजाभाऊ भोसले, गजानन सपकाळ, डॉ. रमेश काळे, अक्षय निकम इत्यादींनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले.














