पैठण, (प्रतिनिधी) : मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठण आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. हंसराज जाधव यांच्या मोहरम या कथासंग्रहावर मंगळवारी (दि. २५) रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात प्रमुख वक्ते समीक्षक डॉ. रामचंद्र काळुंखे (कोषाध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर) आणि प्रसिद्ध कवी संदीप जगदाळे हे भाष्य करणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऊर्मिला चाकूरकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्रा. संतोष तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्र. शाळा, पैठण येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या चर्चासत्र कार्यक्रमात रसिका श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठणचे अध्यक्ष प्रकाश लोखंडे, सुभाष शिंदे, जालिंदर फलके, बजरंग काळे, उदय सुलाखे, अनिल देशमुख, अश्विनी लखमले, प्रा. संतोष गव्हाणे, प्राचार्य आर. बी. रामावत, डॉ. जालिंदर येवले, देवेश इनामदार, लक्ष्मण खेडकर, उषा सोनावणे, विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल तांबे यांनी केले आहे.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठणच्या वतीने प्रतिमाह एका ग्रंथावर चर्चासत्र आयोजित केले जाते. यामध्ये यापूर्वी कवी संदीप शिवाजीराव जगदाळे यांच्या असो आता चाड या प्रसिद्ध कवितासंग्रहावर डॉ. गणेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध साहित्यिक श्रीधर नांदेडकर आणि कवी रवी कोरडे यांनी भाष्य केले होते.
तर साहित्यिक डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांच्या विठोबा या कवितासंग्रहावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य अकादमी प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक प्रदीप गोपाळ देशपांडे यांनी भाष्य केले होते. याप्रसंगी संतोष तांबे, डॉ. राघवेंद्र चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंगळवार, (दि. २५ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता, जिल्हा परिषद कन्या प्र. शाला, पोलीस स्टेशन जवळ येथे तिसरे चर्चासत्र होणार आहे.















