अवैध वाळू उपसामुळे हनुमंतवाडी दादेगाव जहागीरचा रस्ता फुटला

Foto
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थाचे कार्यकारी अभियंता यांचा जावई शोध

पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील हनुमंतवाडी दादेगाव जहागीर या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत राज्य महामार्ग ७५२ ई ते हनुमंतवाडी दादेगाव जहागीर (जुने) दादेगाव जहागीर (नवे) कि.मी.०/००० ते ७/५७० पर्यंत रस्ता सुमारे ०६., कोटी १९ लाख रुपये खर्च करून गावकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत डांबरीकरणाचे काम सहा महिन्यापूर्वी करण्यात आलेला आहे. सदरील काम हे ऐन पावसाळ्यात करण्यात आले होते.

पाऊस सुरू असताना डांबरीकरण केले जात होते. पावसाळ्यात काम सुरू असल्याने कामाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे झाली नाही. या रस्त्यावर खोदकाम न करताच बाजूच्या शेतातील माती टाकून दबाई करून डांबर टाकण्यात आले. त्यामुळे एका महिन्याच्या आतच डांबरीकरण जागोजागी उघडले होते. या संदर्भात दैनिक सांजवार्तामध्ये १० जून २०२५ रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच गावकऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, कक्ष अधिकारी ग्रामविकास बांधकाम भवन मुंबई, तसेच संबंधित खात्याचे वरिष्ठ कार्यालयात ३ जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल  करण्यात आली होती.
 
या तक्रारीला उत्तर देताना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था छत्रपती संभाजी नगरचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले की सदरील ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत डांबरीकरणाचे काम करण्यात आलेले आहे. परंतु सदरील रस्त्यावरून अवजड वाहतूक ही प्रति प्रति एक्सल ८ टन अशी आहे. तसेच सकाळी क्रमांक ० / ०००ते३ / ६०० ह्या लांबी मध्ये रस्ता खचत असून फुटत चाललेला आहे. परंतु या ठिकाणी वाळू लिलाव झाले. नसताना देखील रात्री कमीत कमी ७० ते ८० ट्रक वाळूची अवजड वाहतूक होत आहे. इतर ठिकाणी रस्ता सुरळीत आहे.

या रस्त्यावरून होत असलेली अवजड वाहतूक व अवैध वाळू वाहतूक बंद करण्यात यावी, असे पत्र कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना २१ जुलै २०२५, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय पैठण यांना ६ जून २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक पैठण यांना २४ एप्रिल २०२५ रोजी पाठवून आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.

संबंधित रस्त्याची गुणवत्ता तपासणी आर्थिक देवाण - घेवाण करून थातूरमातूर करण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्ता अनेक ठिकाणी फुटला होता. हाताने डांबर निघत होते. असे असताना संबंधित कार्यकारी अभियंता हे अवैध वाळू उपशामुळे रस्ता खराब होत असल्याचे कारण देऊन ठेकेदाराला पाठीशी घालताना दिसत आहेत. संबंधित कार्यकारी अभयांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या कामाची नाशिकच्या मेरी संस्थेकडून गुणवत्ता तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.