जुन्या शहराला मिळेल नव्या १५०० मिमी योजनेतून पाणी : जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी सुरू
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) अनेक दशकांपासून शहराच्या जुन्या भागाची तहान भागवणारा ऐतिहासिक हसूल तलाव आता पाणी उपशातून मुक्त होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत हसूलपर्यंत तब्बल १,५०० मिलिमीटर व्यासाची मुख्य पाईपलाईन यशस्वीरीत्या टाकण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत ही नवी जलवाहिनी कार्यान्वित होणार असून, त्यानंतर महापालिकेकडून हसूल तलावातून केला जाणारा पाणी उपसा पूर्णपणे बंद केला जाईल. यामुळे जुन्या शहराला नव्या योजनेतून अधिक क्षमतेने पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यानुसार रोज साडेसात एमएलडी पाणी घेतले जाते. मात्र नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हसूलपर्यंत १,५०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली. सध्या या पाइपलाइनची हायड्रॉलिक चाचणी सुरू आहे. दोन-चार दिवसांत ही पाइपलाइन सुरू होताच हसूल तलावातून होणारा पाणी उपसा बंद करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पर्याय कायम राहणार
यंदा पावसाळा लांबणीवर पडला असला तरी सध्या हर्मूल तलावात १९ फूट एवढा पाणीसाठा आहे. या पाण्याचा वापर केला तरी ते दिवाळीपर्यंत पुरेल, असा महापालिकेचा दावा आहे. सध्या पाण्याचा वापर बंद केला जाणार असला तरी गरज पडेल तेव्हा पाणी घेण्याचा पर्यायही उपलब्ध राहणार आहे.
या भागांना मिळते पाणी
हसूल तलावातून भगतसिंगनगर, एकतानगर, चेतनानगर, राजनगर, वानखेडेनगर, मयूरपार्क, सुरेवाडी, मेहमुदपुरा, मुजफरनगर, रोजेबाग, किलेअर्क, जहाँगीर कॉलनी, हसूल, सादात कॉलनी या भागांना पाच एमएलडी रोजचे पाणी हर्सल तलावातून पुरविले जाते.
बोअरना फायदा
सध्या तलावात दिवाळीपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. गरज भासल्यास हे पाणी पर्यायी स्रोत म्हणून वापरले जाईल. महानगरपालिकेने पाण्याचा उपसा थांबवला, तर तलावाच्या आसपासच्या विविध वसाहती आणि वस्त्यांमधील बोअरवेल्सना मोठा फायदा होऊ शकतो. दरवर्षी तलाव कोरडा पडल्याने या बोअरवेल्समधील पाण्याच्या पातळीवर परिणाम होतो आणि कधीकधी पाणीपुरवठा थांबतो.
१९५४ मध्ये निजामाने बांधला तलाव
तत्कालीन शहराची तहान भागविण्यासाठी १९५४ मध्ये निजाम स्टेटने हर्सल तलाव बांधला. त्यानंतर जायकवाडीतून शहरातून पाणीपुरवठा करण्यासाठी १९७५ मधील पहिली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र त्यापूर्वी हसूल तलावच शहराची तहान भागवायचा. ५२ नहरी आणि हसूल तलावातून त्याकाळी ११.५ एमएलडी पाणी शहराला पुरविले जायचे. हसूल तलावाची पाणी साठविण्याची क्षमता २८ फूट एवढी आहे.













