"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल

Foto
सोलापूर  : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका पुस्तकावरून बुलढाण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वादावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. या पुस्तकातील काही मजकुरावर आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र आक्षेप घेत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला. गायकवाड यांनी नंतर या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हा वाद इथेच न थांबता आता रस्त्यावरच्या लढाईत रूपांतरित झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

आमदार संजय गायकवाड यांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्या प्रकाशकाला धमकी देण्यात आली, ते प्रशांत आंबी स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहेत. आंदोलकांनी एक पाऊल पुढे टाकत थेट संजय गायकवाड यांच्या निवासासमोर या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्याचे आव्हान दिले. आंदोलकांच्या या आव्हानाला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "आम्ही शांतपणे पुस्तक ऐकणार आहोत. वाचनादरम्यान जर एकेरी भाषेत उल्लेख करून शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या, तर त्याची सर्व जबाबदारी आयोजक आणि वाचणाऱ्यांची असेल," असं संजय गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

 या वाढत्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. आक्षेप घेणाऱ्यांनी खरोखर ते पुस्तक वाचले आहे का, हा प्रश्न आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

"खरंतर हा निरर्थक वाद निर्माण झाला आहे. हे लक्षात ठेवा की या देशात छत्रपती शिवरायांचा कुणीही अपमान करु शकत नाही. छत्रपतींचा मान इतका मोठा आहे की कुणीही त्यांचा अपमान करणे हे शक्यच नाही. हे पुस्तक १९७९ रोजी लिहिलं आहे. त्याच्यावर आज वाद उकरुन काढायचा आणि दोन्ही बाजूंनी भिडायचे. हे असंवेदनशील कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने हे पुस्तक वाचलं की नाही हे माहिती नाही. आंदोलन करणाऱ्यांना कशासाठी आंदोलन करतोय हे त्यांना माहिती नाही असं मला वाटतं. केवळ कुठलातरी मुद्दा पकडायचा आणि त्यावर वाद निर्माण करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.