छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पिसादेवी रोडवरील
वैशाली ढाब्याजवळ उघड्या रोहित्राचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुरेश कचरू साळवे (४०, रा. आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे.
हे रोहित्र मागील अनेक दिवसांपासून सताड उघडे आहे. शहरात अशाच प्रकारे अनेक रोहित्र धोकादायकपणे उघडे असतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने रोहित्राच्या परिसरात वीजप्रवाह उतरतो. या रोहित्राजवळही असाच काहीसा प्रकार घडला असावा, असा अंदाज स्थानिकांनी वर्तविला. सुरेश साळवे यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
तीन लेकरांचे पितृछत्र हरपले
सुरेश साळवे हे मजुरी काम करायचे. वृद्ध आई, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे तीन मुलींचे पितृछत्र हरपले. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा असा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. पावसाळ्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढतो. विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर तसेच शॉर्टसर्किट झालेल्या विद्युत यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखावे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions












