छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेच्या कचरा गाडीवरील नोकरी गेल्यानंतर बेरोजगार झालेल्या तरुणाने पैशांच्या हव्यासापोटी थेट शेजार्याच्याच घरात डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या पैशातून त्याने चक्क नवीन कपडे, फ्रीज, कूलर आणि पलंग खरेदी करत आपली लाईफस्टाईल बदलली; मात्र हीच अचानक बदललेली ऐषोआराम वृत्ती त्याच्या अंगाशी आली आल्याने तो गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. दीपक दामोधर बोर्डे (३४, रा. वैतागवाडी, कांचनवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी माया संतोष रायकर यांच्या घराशेजारीच आरोपी दिपक बोर्डे हा राहतो. तो पूर्वी महापालिकेच्या कचर्याच्या गाडीवर कामाला होता. मात्र, चार-पाच महिन्यांपूर्वी पालिकेने कंत्राट बदलल्याने बोर्डे बेरोजगार झाला. त्याला दारूचेही व्यसन होते. शेजारील रायकर कुटुंब कामानिमित्त बाहेर जाताच त्याने त्यांच्या घरातील सोनसाखळी, कर्णफुले, सोन्याची पोत, अंगठी असे दागिने कपाटाच्या लॉकरमधून लंपास केले. दागिने विकून बोर्डेने नवीन कपडे, फ्रीज, कूलर आणि पलंगासह फर्निचरचे साहित्य खरेदी केले. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ८४ हजाराचे दागिने आणि दागिने विक्री करून घेतलेले ३४ हजारांचे फ्रीज, कूलर, पलंग असे सामान जप्त केले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, सुनील जाधव, दीपक शिंदे, शिनगारे, वाडीलला जाधव, गीता शिकारे आणि पूजा इंगळे यांच्या पथकाने केली.
खरेदीच्या सपाट्याने आला घेर्यात
बोर्डे नवीन वस्तू खरेदी करून घरी आणत असल्याचा प्रकार पाहून गुन्हे शाखेला संशय आला. रोजगार नसताना एकाच वेळी चार ड्रेस आणि घरात एवढे नवीन साहित्य कसे काय घेऊन आला, याची चौकशी केली. १३ जून रोजी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. साहित्य खरेदी करण्यासह त्याने उरलेले पैसे फिरण्यात आणि दारूमध्ये उडविले.









