फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील वावना येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी हे उपकेंद्रात वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच हे उपकेंद्र अनेकवेळी कुलूपबंद दिसून येत आहे.
उपकेंद्रात एक सीएचओ, एक आरोग्य सेविका व एक एएनएम असे तीन आरोग्य कर्मचारी कार्यरत आहे. गाव मुख्य आरोग्य केंद्रापासून लांब असल्यामुळे कर्मचारी जेव्हा मनात येईल तेव्हा येतात व जातात. यामुळे आरोग्य सेवेचे काम पूर्णतः थांबून जाते. सेवक-सेविका घरोघरी जाऊन प्राथमिक स्वरूपाच्या आजाराचा उपचार करीत असतात, गरोदर व स्तनदा मातांची तपासणी करण्यासाठी आरोग्य सेविकेची भूमिका महत्त्वाची असते. मात्र येथे कर्मचाऱ्यांच्या दांडी मारल्याने हे सर्व ठप्प होत असते.
वावना सहित पाडळी व परिसरातील अनेक जण उपचारासाठी येथे येतात, परंतु कर्मचाऱ्यांच्या वेळी अवेळी येण्याची सवयीमुळे रुग्ण वाट बघून निघून जातात. या भागात खासगी डॉक्टरांचीही वानवा आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सदर उपकेंद्रात तत्काळ लक्ष दयावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन...
बाबरा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत ३ उपकेंद्र आहेत. आरोग्य सेवाही २४ तासांची व अत्यावश्यक असल्याने उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश आरोग्य कर्मचारी शहरातून अप डाऊन करतात.