विजय म्हस्के पाटील यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
सिल्लोड, (प्रतिनिधी) : वांगी खुर्द येथे काही दिवसांपासून अत्यंत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शुद्धीकरण न केलेल्या पाण्यामुळे गावात लहान मुलांसह अनेकांना आजारपणाला तोंड द्यावे लागत आहे.
मुतखड्याच्या (किडनी स्टोन) रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच गावातील नाथवाडी परिसरात शंकर बाबर यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचल्याने तिथे डेंग्यू आणि मलेरियासारख्या साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्यांबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष विजय म्हस्के पाटील यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
पाणीपुरवठा विहिरीची स्वच्छता करून तातडीने शुद्ध पाणी द्यावे आणि साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावून तिथे जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.















