हृदयविकार आणि हार्ट फेल्युयरचे आजार सध्या वाढताय; तज्ञांकडून व्यक्त होतेय चिंता...
उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर: सध्या सर्वाधिक आजाराचे प्रमाण पहाता हृदय विकाराचा झटका (हार्ट अटॅक) आणि हार्ट फेल्युयर सारखे आजार वाढत आहे. धावपळीच्या जीवनात आनंदी राहणेच आपण विसरत चाललो. त्याचा परिणाम शरीरावर होत आहे. हृदय विकार आणि हार्ट फेल्युयर या सारखे आजार सध्या वाढत असल्याची चिंता ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. सतिष रोपळेकर यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली. हृदय विकार आणि हार्ट फेल्युयर पासून बचाव करण्यासाठी निरोगी आणि आनंदी जीवन जगा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
हृदय विकाराचा झटका, हार्ट फेल्युयर सध्या हे आजार बळावत आहे. त्याची कारणे पाहिले तर जास्त वाढलेला रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण, धूम्रपान करणे, स्थूलपणा, व्यायामाचा अभाव, सततचा मानसिक ताण या सर्व गोष्टी हृदयविकाराला कारणीभूत ठरत आहे. तसेच अती तेलाचे प्रमाण, अति स्निग्ध पदार्थचे सेवन करणे ही देखील कारणे या आजाराला कारणीभूत ठरतात. तसेच ब्लॉकेजचे आजार याच गोष्टी मुळे होतात. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या हृदय विकाराचे वाढते प्रमाण ही बाब अंत्यत चिंताजनक बनली आहे. त्यासाठी निरोगी आणि आनंदी जीवन जगता कसे येईल यावर भर दिला पाहिजे. असेही आवाहन हृदय रोग तज्ञांकडून केले जात आहे.
व्यसनमुक्त आणि तणावमुक्त रहा
हृदविकाराचे प्रमाण वाढण्याची कारणे पाहिले तर सध्या ताण तणाव वाढलेला दिसतो. तणावाखाली राहू नये. तसेच धूम्रपान करणे टाळावे. रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, रक्तातील वाढलेले चरबीचे प्रमाण याकडे लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी , व्यायाम करावा. सततचा होणारा मानसिक ताण कमी कसा होईल. याकडे लक्ष केंद्रीय करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. इतकेच नव्हे तर ताण तणावापासून जेवढे दूर राहता येईल तेवढे राहावे. व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. संतुलित आहार घेऊन अतिचरबीयुक्त पदार्थ टाळावे, व्यसनमुक्त आणि तणावमुक्त जीवन जगावे. कमी तेलाचा वापर करावा. महिनाकाठी एका व्यक्तिमागे अर्धा लिटर तेल आहारात सेवन केले पाहिजे. याशिवाय मधुमेह नियंत्रणात ठेवले पाहिजे. निरोगी जीवनशैली, व्यसनापासून दूर राहावे, नियमित व्यायाम केला पाहिजे. शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य निरोगी राहिले पाहिजे. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित पाहिजे. औषध,गोळ्या, पथ्य तसेच आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नियमित तपासण्या केल्या पाहिजे. स्ट्रेस कमी कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रीत करावे.
निरोगी आणि आनंदी जीवन जगा : डॉ. सतिष रोपळेकर
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम देखील शरीरावर होत असतो. स्थूलपणा वाढू देऊ नये. यासाठी उपाय करावे. व्यायामाचा अभाव असल्याने देखील हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे व्यायामाला वेळ दिलाच पाहिजे. निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा, नेहमी आनंदी राहावे चाळिशीनंतर प्रत्येक व्यक्तीने तपासण्या करून घेतल्या पाहिजे. निरोगी जीवनशैली ठेवा. नियमित व्यायाम करावा. प्रति व्यक्तीने दर महा अर्धा लिटर तेलाचा वापर करावा. तणावमुक्त जीवन आणि आनंदी जीवन जगावे. असे आवाहन ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. सतिष रोपळेकर यांनी केले आहे.