अखिलेश यादव - वेणुगोपाल यांच्यात संसदेबाहेर खडाजंगी , काँग्रेस आणि भाजपमध्ये गुप्त 'डील' झाल्याचा थेट आरोप

Foto
नवी दिल्ली :  पेपरफुटी आणि आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ सुरू असतानाच विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लोकसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये गुप्त 'डील' झाल्याचा थेट आरोप केला. यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित होताच संसदेच्या बाहेर अखिलेश यादव आणि काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्यात बाचाबाचीचा प्रकार घडला आहे. 

"तुमची आपापसात डील झालीय का?" – अखिलेश यादव यांचा सवाल
बुधवारी लोकसभेत NEET च्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अध्यक्षांनी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची संधी दिली. मात्र, समाजवादी पक्षाला बोलू न दिल्याने अखिलेश यादव भडकले. अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यांना उद्देशून अखिलेश म्हणाले, "हा विषय कोणत्या एका पक्षाचा नसून देशातील तरुणांच्या भविष्याचा आहे. तुम्ही यांना आणि त्यांना बोलू दिले, मग आमचे काय? तुमची आपापसात काही तडजोड झाली आहे का?" असा सवाल केला. 

संसदेच्या बाहेर वेणुगोपाल आणि अखिलेश आमनेसामने
अखिलेश यांच्या या 'डील'च्या आरोपावर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल नाराज झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत सभागृह स्थगित झाल्यानंतर वेणुगोपाल यांनी संसदेबाहेर अखिलेश यादव यांना अडवून जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. "शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे नंतरही घेतले जाऊ शकतात. पण आधी २० जुलैला आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जो रानटी लाठीमार केला, डोकी फोडली आणि कपडे फाडले, त्यावर आम्हाला सरकारकडून उत्तर हवे आहे.", असे यादव यांनी वेनुगोपाल यांना सुनावले. 

आम आदमी पार्टीचाही राहुल गांधींवर निशाणा
केवळ समाजवादी पक्षच नव्हे, तर याआधी मंगळवारी 'आप' नेते संजय सिंह यांनीही काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले होते. "भाजपने जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन कमकुवत करण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान निवासाबाहेर धरणे आंदोलन करण्याची परवानगी दिली," असा थेट आरोप संजय सिंह यांनी केला होता.