छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करत बुधवारी सायंकाळी शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले. दिवसभर प्रचंड उकाडा आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते; मात्र सायंकाळी अचानक हवामानात नाट्यमय बदल झाला. काळेकुट्ट ढग दाटून येत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. रात्री ११:३० वाजेपर्यंत शहरात तब्बल ४३.२ मिलिमीटर पावसाची
नोंद झाली असून, या दमदार हजेरीमुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले होते.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारी सायंकाळी ७ वाजता नाऊकास्ट यलो वॉर्निंग जारी केली होती. या इशाऱ्यात पुढील तीन तासांत छत्रपती संभाजीनगरसह नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, हिंगोली, नांदेड, जालना आणि बीड जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. हवामान विभागाचा हा अंदाज काही तासांतच खरा ठरला आणि
शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला.
तापमानात घट
हवामान केंद्राच्या नोंदीनुसार बुधवारी शहराचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवेतील आर्द्रता तब्बल ९७टक्के असल्याने दिवसभर उष्मा आणि दमट वातावरण जाणवत होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता सकाळपासूनच निर्माण झाली. सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि काही मिनिटांतच शहरभर पावसाचा जोर वाढला. पावसाच्या सुरुवातीलाच अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचले.
सिडको, सातारा परिसर, जालना रोड, मुकुंदवाडी, उस्मानपुरा, क्रांती चौक, रेल्वे स्टेशन परिसरासह अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यालये सुटण्याच्या वेळेत पाऊस सुरू झाल्याने वाहनचालकांना मोठा फटका बसला. अनेक दुचाकीस्वारांनी उड्डाणपूल, पेट्रोल पंप आणि दुकानांच्या आडोशाला आश्रय घेतला. काही ठिकाणी वाहतूक संथ झाली, तर चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या.
दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बारानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली.
पिकांना फायदा
जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या, तर विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळच्या वेळेत बाजारपेठांमध्ये गर्दी कमी झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने पादचाऱ्यांचीही मोठी गैरसोय झाली. शहरातील नाले आणि गटारे तुडुंब भरल्याने सखल भागातील नागरिकांना पाणी घरात शिरण्याची भीती निर्माण झाली होती. दमदार पावसामुळे शेतजमिनींमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला असून सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि इतर खरीप पिकांच्या उगवणीला मोठा फायदा होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
काही दिवस ढगाळ वातावरण
विहिरी, तलाव आणि लहान बंधाऱ्यांच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अधूनमधून मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर थांबू नये, मोठ्या झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.