नवी दिल्ली : तिबेटमधून आलेल्या भीषण पुराच्या लोंढ्याने मध्य नेपाळमध्ये हाहाकार माजवला. भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरात शेकडो जण दगावल्याची भीती असून आतापर्यंत ९५ मृतदेह सापडले आहेत. भारतीयांसह बेपत्ता नागरिकांची संख्या ७५० हून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नेपाळमधील त्रिशुली नदी पुढे भारतात येऊन गंडक नदी बनते. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३ मीटरपर्यंतची पुराची लाट येण्याची शक्यता असल्याने तिथेही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यातच उत्तर प्रदेश आणि बिहारसह १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात या १४ राज्यांसाठी मुसळधार पावसासह वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील १० तास डोंगराळ भागात राहणार्या लोकांसाठी भूस्खलनाचा इशारा जारी करण्यात आला आहे. काही राज्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. घनदाट जंगल असलेल्या भागांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे.
बिहार, उत्तर प्रदेशमध्ये हवामान खात्याचा अलर्ट
मुझफ्फरनगर, गौतम बुद्ध नगर, मेरठ, गाझियाबाद, मुरादाबाद, आग्रा, मथुरा, बहराइच, कानपूर, बलरामपूर, महाराजगंज, देवरिया, हमीरपूर, प्रयागराज, सोनभद्र, फतेहपूर, गोंडा, गोरखपूर, लाझापूर, झांसी, मिर्झापूर आणि झांसी येथे मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तर, बिहारमधील पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गया, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, मुझफ्फरपूर, रक्सौल, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, सहरसा, सुपौल, अररिया, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा आणि बेगुसराई येथे मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गंडक, नारायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता
तिबेटमधून आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळमधील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशात बुधवारी हाय अलर्ट जारी करण्यात आला. गंडक आणि नारायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही राज्यांनी आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. बिहारमधील गंडक बंधार्याचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले असून, उत्तर प्रदेशातील पूरप्रवण भागांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी सुरू आहे. बिहारमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गंडक नदीवरील बंधार्याचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. वाल्मीकिनगर येथील गंडक बंधार्यातून सुमारे ८६ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. गंडक नदीच्या खोर्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन
नेपाळमधील देवघाट येथील मोजणी केंद्रावर नारायणी नदीची पाणीपातळी ४.७७ मीटर होती. धोक्याची पातळी ९ मीटर, तर इशारा पातळी ७.३० मीटर आहे. नदीची पातळी आणखी वाढल्यास सुमारे साडेतीन तासांत पुराचे पाणी गंडक बंधार्यापर्यंत पोहोचू शकते, असे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यात गंडक नदीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे. नेपाळमधून वाढलेला पाण्याचा प्रवाह भोते कोशी-त्रिशूली नदी प्रणालीमार्गे खालील भागांवर परिणाम करू शकतो. कुशीनगरमध्ये मार्चहवा, शिवपूर आणि इतर काही गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यासाठी गावांमध्ये दवंडी आणि घोषणा केल्या जात आहेत. खड्डा तहसीलमधील शिवपूर, हरिहरपूर, नारायणपूर, मार्चहवा आणि बसंतपूर या गावांमध्ये विशेष दक्षता ठेवण्यात आली आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये वादळी वारे
उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग, डेहराडून, उत्तरकाशी, नैनिताल, बागेश्वर, पिथोरगड, पौरी गढवाल, चमोली आणि चंपावतसाठी पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी, शिमला, कुल्लू, कांग्रा, चंबा, किन्नौर, सोलन आणि बिलासपूर येथे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वार्याची शक्यता आहे. वार्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग, बडगाम, कुलगाम, रामबन, किश्तवार, मीरपूर, रियासी, जम्मू आणि कठुआसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.