महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, नागपूरसह इतर संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून गेल्या २४ तासांत शहरातील काही भागांमध्ये १५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील २ दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली आहे.
दरम्यान, कोकणातही पावसाचा जोर कायम असून, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पातळी ४.९० मीटरपर्यंत पोहोचली आहे. ही नदी धोक्याच्या ५ मीटर पातळीच्या अगदी जवळ पोहोचल्याने प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. राज्यातील संभाव्य पूरस्थिती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनने महाराष्ट्र आणि गोव्यातील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये बचाव पथके पूर्वतयारी म्हणून तैनात करण्यात आली आहेत.