छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) ः अलनिनोच्या प्रभावाने मराठवाड्यावर जणू पाऊस रूसला होता. अर्धा पावसाळा संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सततधार तर कुठे जोरदार पाऊस बरसला. मराठवाड्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. जालना, परभणी आणि नांदेड या तीन जिल्ह्यात तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ३३ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीलायक पाऊस झाल्यानंतर तब्बल दोन तीन आठवडे पावसाने दडी मारली. परिणामी अनेक भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. जुलै महिनाही अर्धा कोरडा ठाक गेला. परिणामी मराठवाड्यातील अनेक प्रकल्पात पाणी साठा झालाच नाही. अलनिनोचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यावर झाला. पाऊस गायब झाल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. परिणामी शेती पिकांना जीवदान मिळाले. गेल्या दोन दिवसांपासून तर सततधार पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले आहे.
या मंडळात झाली अतिवृष्टी...
छत्रपती संभाजीनगर : उस्मानपुरा ६६.३ मी. मी., चिकलठाण ९०.५ मी. मी., चित्तेपिंपळगाव - ७२.८ मी. मी., करमाड ७२.८ मी. मी., पिसादेवी ७२.० मी. मी., वरुड काझी ७२.० मी. मी.
तालुका पैठण : आडूळ ६९.८ मी. मी., पिंपळगाव ६६.८ मी. मी., ढोरकीन ६७.० मी. मी., बीडकीन ७६.५ मी. मी., पैठण ७७.० मी. मी., निजलगाव ७६.५ मी. मी.
तालुका कन्नड : चिंचोली ७७.० मी. मी., करंजखेड ८२.३ मी. मी.
तालुका सिल्लोड : सिल्लोड ११५.० मी. मी., निल्लोड ९५.८ मी. मी., भराडी १३७.३ मी. मी., गोळेगाव १२६.३ मी. मी., अजिंठा ९३.० मी. मी., आमठाण- १३७.३ मी. मी., बोरगाव १३७.३ मी. मी., अंभाई १३७.३ मी. मी., पालोद १२६.३ मी. मी., शिवना १०३.० मी. मी., उडणगाव- १२६.३ मी. मी.
तालुका सोयगाव : सोयगाव १४१.८ मी. मी., सावळदबारा ११७.५ मी. मी., बनोटी ९७.३ मी. मी., जरंडी १४१.८ मी. मी.
तालुका फुलंब्री : फुलंब्री ७६.८ मी.मी., आळंद ६८.० मी. मी., पिरबावडा ६८.० मी. मी., वडोदबाजार - ६८.० मी. मी.
सिल्लोड तालुक्यात मौजे केळगाव, आधारवाडी, केहर्हाळा या तिन्ही गावात झालेल्या पावसाळामुळे केळगावकडे जाणार्या पुलावरून पाणी जात असल्याने सदर तिन्ही गावांचा तात्पुरता संपर्क तुटलेला आहे.