महाराष्ट्रात परतीच्या पावसाची राज्यभर तुफान हजेरी, आणखी ३ दिवस बरसणार पण कुठे ?

Foto
पुणे  :   पश्चिम राजस्थानातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागलाय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झाला असून अनेक भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, घाटमाथासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे. 

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून ठिकठिकाणी हवामान खात्याने अलर्ट दिले आहेत. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

हवामान विभागाचा अंदाज काय?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सध्या सुरू झाला आहे. राजस्थान पंजाब आणि गुजरात या राज्यांमधून पुढील दोन दिवसात पाऊस एक्झिट घेणार असून तेलंगणा राज्याला जोडून विदर्भात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.  

दुसरीकडे बंगालच्या उपसागरावर तसेच अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भागात चक्राकार अरे सक्रिय असल्यासही हवामान खात्याने नोंदवलय. ज्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात विस्तीर्ण स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. 

पुढील तीन दिवस कसे राहणार हवामान? 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज, 15 सप्टेंबर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील तीन दिवस हा जोर हळूहळू कमी होणार तूरळक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून धरणांमधून मोठा विसर्ग होतोय. त्यामुळे  अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  उद्यापासून पुढील चार दिवस हवामान विभागाने पुढील प्रमाणे अंदाज व्यक्त केला आहे. 

16 सप्टेंबर: रायगड छत्रपती संभाजीनगर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित कोकणपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर व सिंधुदुर्ग तसेच विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे हाय अलर्ट आहेत.  

17 सप्टेंबर: विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार असून यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. बीड लातूर व नांदेड जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता असून उर्वरित मराठवाड्यात येलो अलर्ट देण्यात आलाय. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र व सिंधुदुर्ग वगळता कोकणपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट. पुणे सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव  यलो अलर्ट.  सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता. 

18 सप्टेंबर: रत्नागिरी रायगड ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना, जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता 

19 सप्टेंबर: नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना, रायगड जिल्हाला पावसाचा येलो अलर्ट. बहुतांश मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता.