गंगापूरला मुसळधार पावसाने शिवना, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर

Foto
गंगापूरला मुसळधार पावसाने शिवना, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर

पूरामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर, अतिवृष्टीमुळे अडकलेले काही कुटुंब सुरक्षित बाहेर काढले

अलिम चाऊस
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवना, गोदावरीसह इतर नद्यांना पूर आला असून, तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने वेळीच हस्तक्षेप करत शेकडो नागरिकांचे रेस्क्यू व स्थलांतर केले असून, बाहतूक व जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

अतिवृष्टीमुळे गंगापूर तालुक्यातील मौजे काटेपिंपळगाव येथे शिवना नदी पात्रा बाहेर वाहत असलेने नदी काठच्या घरा मध्ये व शेत वस्ती मध्ये राहणाऱ्या घरा मध्ये पाणी शिरल्याने काही कुटुंब अडकलेले सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तालुक्यामध्ये गोदावरी व शिवना नदी दुथडी वरून वाहत असल्याने दोन्ही नद्यांना महापूर आला आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठी असलेल्या अमळनेर येथे सकाळीच १२ नागरिकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवले. 

शिवना नदीकाठी असलेल्या मालुंजा गावात शिवना नदीला मोठा पूर आल्याने गंगापुर लासुर स्टेशन मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. पुलावर सुमारे १० फूट पाणी वाहत आहे. याच ठिकाणी २ शेतकयांनी झाडावर चढून महसूल प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवला व तात्काळ पंचनाम्याची मागणी केली. रेस्क्यू टीमने त्यांना सुखरूप खाली उतरवले. नरसापूर येथे पत्र्याच्या शेडमध्ये अडकलेला एक व्यक्ती, आणि पेंडापूर येथे शेतात अडकलेले ६ नागरिक यांनाही सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. काटेपिंपळगाव येथे शिवना नदीच्या पुरामुळे अडकलेले २-३ कुटुंबीय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने हलवले. 

दहेगाव बंगला येथील नाल्याच्या प्रवाहात एक बैलगाडी वाहून गेली, मात्र अद्याप ओळख पटलेली नाही. आंबेलोहळ येथे नदीचे पाणी गावात शिरले होते. काही काळासाठी परिस्थिती गंभीर होती, पण आता नियंत्रणात आहे. अतिवृष्टीमुळे गंगापूर तालुक्यातील मौजे काटेपिंपळगाव येथे शिवना नदी पात्रा बाहेर वाहत असलेने नदी काठच्या घरा मध्ये व शेत वस्ती मध्ये राहणाऱ्या घरा मध्ये पाणी शिरल्याने काही कुटुंब अडकलेले रात्री ८:३० वाजे पर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे सदर काम टीम व नायब तहसीलदार सचिन वाघमारे व सी.एस. मरमट ग्राम महसूल अधिकारी, तसेच महसूल सहाय्यक, महसूल सेवक व ग्रामस्थ यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.