जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी... २७ मि.मी. पावसाची नोंद ; चार मंडळात अतिवृष्टी

Foto
औरंगाबाद: शहरासह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज रविवारी सकाळपर्यंत हा पाऊस सुरूच होता. आज सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७ मिलिमीटर पाऊस झाला असून, चार मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आलेली आहे.

पावसाळा सुरू होऊन पंधरवडा लोटल्यानंतर देखील समाधान कारक पाऊस झालेला नाही. शनिवारी दुपारपासूनच आकाशात ढग दाटून आलेले होते. त्यातच प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक अक्षरशः घामाघूम झाले होते.दरम्यान सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात  शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने तासाभरातच शहरातील रस्ते व नाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक ठिकाणी रस्त्यातच पाण्याचे तळे साचलेले चित्र निदर्शनाला आले. रात्री काही वेळा उघडीप दिल्यानंतर सकाळी पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला. दहा वाजेच्या सुमारा पर्यंत सुरू होता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २७.४७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस फुलंब्री तालुक्यात ८१.२५ मिलिमीटर तर  सर्वात कमी  कन्नड तालुक्यात ८.६३ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण ६५ मंडळापैकी चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात शहरातील उस्मानपुरा, फुलंब्री, वडोद बाजार, वैजापूर तालुक्यातील नागमठान या मंडळांचा समावेश आहे.

तीन मंडळात १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस 
या वेळी तीन मंडळांमध्ये १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. यात उस्मानपुरा ११० मिमी, फुलंब्री ११५, वडोद बाजार ११५मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आलेली आहे. यासह वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथेदेखील ८१ मिमी पाऊस पडला. वरील चारही मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.

कन्नड मध्ये सर्वात कमी पाऊस
औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केल्यास कन्नड तालुक्यात सर्वात कमी  तर सर्वाधिक पाऊस हा फुलंब्री तालुक्यात झाला. प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नोंदीनुसार औरंगाबाद तालुक्यात ३९ मिमी, फुलंब्री ८१.२५, पैठण १५.६०, सिल्लोड १६.३८, सोयगाव १५, वैजापूर २१.२०, गंगापूर २४.५६, कन्नड ८.६३, तर खुलताबाद तालुक्यात २५.६७ मिलिमीटर एवढा पाऊस झाला.