हाईट टॉपिंग कामावर पाण्याची काटकसर रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये शंका !

Foto

औरंगाबाद:  राज्य शासनाने रस्त्यासाठी दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्य निधीतून सध्या रस्त्याची कामे केली जात आहे. पण ही कामे करतांना रस्त्याच्या गुणवत्तेकडे मात्र मनपा अधिकारी आणि पीएमसीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे रस्त्याच्या मजबुतीकरणाबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. मनपा आयुक्तांनी रस्त्याच्या कामांकडे लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे.शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. महानगरपालिकेकडे रस्ते दुरुस्तीसाठी निधी नसल्याने प्रशासनाने राज्य शासनाकडे रस्ते बांधणीसाठी दिडशे कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. मनपाच्या प्रस्तावानंतर 2018 मध्ये राज्य शासनाने मनपाला शंभर कोटी रुपयांचा निधी दिला. शासनाने निधी दिल्यानंतर ही मनपाने रस्त्याची यादी तयार करण्यास सहा महिने घातले त्यानंतर कुठे रस्त्यांच्या निविदा निघाल्या. शहरातील 50 रस्त्यांसाठी चार निविदा काढण्यात आल्या. गुरुनानक एजन्सी, जे.पी. एजन्सी, मस्कत एजन्सी व राजेश कन्स्ट्रक्शन एजन्सी यांना व्हॉईट टॉपिंग रस्त्याची कामे देण्यात आली आहेत. 

सिडकोतील चिश्तीयाचौक-अविष्कार कॉलनी-बजरंग चौक या रस्त्याचे सध्या काम गुरुनानक  एजन्सी मार्फत सुरु आहे. रस्त्याचे कॉक्रिटीकरण केल्यानंतर त्यावर पाणी मारणे महत्वाचे काम आहे. काँक्रिट मजबुत व्हावे यासाठी कॉक्रिट रस्त्यावर कॅरी करणे आवश्यक असते. कैरीमध्ये पाणी साठवून ठेवल्याने सिमेंटचे काम मजबुत राहते. किमान 21 दिवस रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक आहे. पण कंत्राटदाराकडून रस्त्यावर कॅरी तर केलेलीच नाही. त्यावर पोते टाकून थातूर-मातूर पाणी मारले जात आहे. त्यामुळे रस्त्याचे मजबुतीकरण होणार नाही. रस्ता मजबुत झाला नसल्याने काही वर्षातच या रस्त्याची दुरावस्था होणार आहे. त्यामुळे मनपाचे पैसे पाण्यात जाण्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. किमान 21 दिवस पाणी टाकणे आवश्यक असतांना दहा-बारा दिवस रस्त्यावर पाणी टाकून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. 

अधिकाऱ्यांना सांगतो : आ.सावे 
पूर्व विधानसभेचे आमदार अतुल सावे यांच्याशी सांजवार्ता प्रतिनिधीने सिडकोतील रस्त्याच्या मजबुतीकरण बाबत प्रश्न उपस्थित केला असता,त्यांनी याबाबत आपण लागलीच मनपाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावर कॅरी टाकण्याबाबत सांगतो असे सांगितले. 

अभियंत्यांच्या अकलेचे दिवाळे 
सिडकोतील रस्त्याच्या कैरी केली नसल्याबाबत सांजवार्ता प्रतिनिधीनेमनपातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सिडकोतील रस्त्यावर उतार असल्याने रस्त्यावर कॅरी  केलेलया नाहीत. कॅरी केल्यास काही भागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे रस्त्यावर पोते  टाकून त्यावर पाणी मारले जात असल्याचे अकलेचे तारे तोडले . कंत्राटदाराकडून पाण्याची काटकसर केली जात असल्याबाबत मनपाकडून कंत्राटदारास पाठीशी घातल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे. 

पीएमसीला मोफत लाभ
दरम्यान, रस्त्याच्या कामाची देखरेख व गुणवत्ता तपासणीसाठी मनपाने पीएमसीची नियुक्ती केलेली आहे. श्रीखंडे एजन्सी या पीएमसीला काम देण्यात आलेले आहे. ही कंपनी बाहेर गावची आहे. त्यामुळे सिडकोतील कामावर पीएमसीचे लक्ष नाही. मनपाकडून पीएमसीला फुकटची रक्कम दिली जात असल्याचे दिसते.