खाकीवरच धडक कारवाईने हेल्मेट सक्ती मोहिमेचा श्रीगणेशा

Foto
विनाहेल्मेट २६ पोलिसांवर कारवाई; २६ हजारांचा दंड
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि हेल्मेट सक्तीसाठी शहर पोलिस दलाने अनोखा पुढाकार घेतला आहे. आधी नियम स्वतःपासून ही भूमिका घेत वाहतूक शाखेने थेट पोलिस ठाणे आणि कार्यालयांसमोरच धडक मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत सोमवारी (दि. १०) विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या २६ पोलिस अधिकारी व अंमलदारांवर दंडात्मक कारवाई करत २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस विभागातील सर्व अधिकारी आणि अंमलदारांना दुचाकी वापरताना सक्तीने हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने मागील तीन महिन्यांपासून पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार नेमून, विनाहेल्मेट प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. या आदेशाची शहरातील सर्व पोलिस ठाण्यांत व इतर कार्यालयांत प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने १० ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेने तपासणी मोहीम राबवली. यावेळी पोलिस ठाणे व कार्यालयांसमोर जे अधिकारी व अंमलदार विनाहेल्मेट ड्युटीवर येत होते, अशा २६ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून २६ हजार रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी
Stt JAIG
३ हजार रुपये दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपआयुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, पवन चौधरी, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे, सचिन मिरधे व त्यांच्या अधिपत्याखालील अंमलदारांनी केली. पोलिस आयुक्तांनी शहरातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय प्रमुखांना पत्र पाठवून त्यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन यापूर्वीच केले होते. पोलिसांवरील या कारवाईनंतर आता शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवेश करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेचे पथक नेमण्यात येणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions