हायवाची दुचाकीला धडक : मुलगा ठार, आई गंभीर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : रहिमाबाद येथे शनिवारी दुपारी हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मोटारसायकल स्वार ठार झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. कन्नड तालुक्यातील आडगाव भोसले येथील अमोल जनार्दन भोसले हा आपल्या आई गीताबाई भोसले यांच्यासह धार्मिक कार्यासाठी भोकरदनला जाण्यासाठी दुचाकीने (एमएच २० ईबी. ९४३) सिल्लोडकडे येत होते. 

तर यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या हायवाच्या (एमएच २० जीझेड ४९२८) चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत दुचाकीवरील अमोल जनार्दन भोसले (३६) जागीच ठार झाले, तर त्यांची आई गीताबाई भोसले गंभीर जखमी झाल्या.

त्यानंतर त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमोलचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, तर गीताबाई भोसले यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले.

या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेतली असल्याचे पोलीस नाईक संजय आगे यांनी सांगितले.