सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
पैठण, : (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ विरोधात पैठण येथे सर्वसामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी बस स्थानक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. शासनाची ही योजना शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी व फसवी असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदविला.
यावेळी शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना समान न्याय देण्याऐवजी शासनाने विविध अटी व मर्यादा लादल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप
त्यांनी केला. सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच योजनेतील अन्यायकारक अटी तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात सर्वसामाजिक संघटनेचे पदाधिकारी माऊली मुळे, किशोर सदावर्ते, साईनाथ कर्डिले, पवन सिसोदे, सुभाष नवथर, रामेश्वर बावणे, अनिल राऊत, विशाल काळे, ज्ञानेश्वर उगले, शिवाजी साबळे, कृष्णा काळे, विष्णू बर्डे, शिवाजी साटोले, कैलास मोरे, संभाजी डांगे, एकनाथ मिसाळ, अशोक ठोंबरे यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












