औरंगाबाद : सुट्ट्या पैशाच्या वादातून आठ-ते दहा जणांनी एका 25 वर्षीय तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 30 एप्रिल रोजी रांजणगाव शेणपुंजी येथील क्लिप्टन वाईन शॉपजवळ घडली.गोपाळ बाबासाहेब देशमुख (वय 25 वर्षे, रा.रांजणगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गोपाळ देशमुख हा 30 एप्रिल रोजी रांजणगाव (शे.) जवळील क्लिप्टन वाईन शॉप येथे गेला होता. 10 रुपये सुट्टे नसल्याने त्याने 100 रुपयांची नोट दुकानदाराला दिली. सुट्ट्या पैशावरून त्याचा दुकानदारासोबत वाद झाला. त्यातून वाईन शॉपमधील आठ ते दहा जणांनी गोपाळला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर गोपाळला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गोपाळ देशमुख याला अमानुष मारहाण केल्याच्या घटनेला दोन दिवस उलटले आहेते. पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदविणे अनिवार्य असताना अद्यापही जखमी गोपाळचा एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जबाब नोंदविलेला नाही.