नागरिकत्वाच्या मुद्यावरून राहुल गांधींना गृह मंत्रालयाची नोटीस

Foto

नवी दिल्‍ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत भाजपचे नेते  खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. यावर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठविण्यात आला असून, येत्या पंधरा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे केली होती. मात्र, यावेळी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला होता. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या ब्लॅक ऑप्स लि. या कंपनीच्या कागदपत्रांवर ब्रिटनचा नागरिक असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. या कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला होता. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले होते. या मुद्द्यावर भाजपने काँग्रेस पक्षाकडे स्पष्टीकरण मागितले होते. याप्रकरणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रारही दाखल केली होती. भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी खा. स्वामी यांनी केली होती. मंगळवारी गृहमंत्रालयाने या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.